Menu Close

ऐतिहासिक शनिवारवाड्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे : अटकेपार झेंडा फडकवणारे आणि हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे बाजीराव पेशवे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि पेशव्यांचा वाडा म्हणून ओळखली जाणारी वास्तू म्हणजे शनिवारवाडा. छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पेशव्यांनी याच वाड्यातून कारभार हाकला. ऐतिहासिक वारसा असलेल्या या वास्तूकडे मात्र पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात महानगरपालिकेने व्यासपिठ आणि त्याच्या समोर बाजीराव पेशवे यांचा अश्‍वारुढ पुतळा उभारला आहे; मात्र या पुतळ्याच्या चौथर्‍याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. गेले अनेक महिने या चौथर्‍यावरील एका बाजूचा बराचसा संगमरवरी भाग पडून गेला असून त्यामुळे चौथर्‍यावर लिहलेल्या बाजीरावांविषयीच्या मजकूराचा संदर्भ लागत नाही.

बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या चौथर्‍यावरील संगमरवराचा निघालेला ढलपा

याशिवाय मराठी आणि इंग्रजी भाषेत पेशवाईविषयीची माहिती आजूबाजूच्या भिंतींवर लिहली आहे; मात्र त्यातील अक्षरे आता पुष्कळ फिकट झाली आहेत. या स्मारकाला लागूनच असलेल्या भागात कचर्‍याचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे.

बाजीराव पेशव्यांच्या स्मारकालगतच्या परिसरातील अस्वच्छता

पानाच्या पिचकार्‍यांमुळे पुतळ्यालगतचे दोन दरवाचे लाल झाले आहेत. याशिवाय शनिवारवाडा पहायला येणारे पर्यटक, तसेच स्थानिक नागरिक यांच्यामध्ये शिस्तबद्धतेचाही अभाव आहे.

आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे या ठिकाणी फिरण्यासाठी येणार्‍या प्रेमी युगुलांची संख्याही वाढत आहे. बर्‍याच वेळेला शनिवारवाड्याकडे जातानाच्या मार्गात किंवा बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या बाजूला अनेक तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत बसलेले असतात. ज्या ठिकाणाहून मोगलांना धूळ चारण्याचे मनसुबे रचले गेले, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांवर उदार होऊन लढणारे लढवय्ये, बुद्धीमान वीर निर्माण झाले, त्या ऐतिहासिक स्थानाच्या ठिकाणी तरुणांचे ‘अशा’ प्रकारचे वर्तन होणे निषेधार्ह आहे; मात्र योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे या युवकांना ना सुरक्षारक्षक हटकतात ना तेथे येणारे अन्य ज्येष्ठ नागरिक.

शनिवारवाडा परिसरातील झाडावर लाल निशाण

शनिवारवाड्यासमोर असलेल्या झाडावर लाल निशाण फडकत असल्याचे आढळून आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा एका झाडावर फडकत असल्याचे आढळून आले. त्या झेंड्याची स्थिती पहाता हा झेंडा जाणीवपूर्वक लावल्याचे दिसत होते. कम्युनिस्ट विचारधारा हिंदुत्वाच्या विचारांची कट्टर विरोधक आहे. वैचारिक विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वाशी संबंधित ऐतिहासिक वास्तूवर भाकपचा झेंडा लावणे हे वैचारिक शत्रुत्व दाखवण्यासाठीच जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे कि काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *