कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिरातील काशीकुंड आणि मनकर्णिका कुंड यांची स्वच्छता करून भाविकांसाठी ही दोन्ही कुंडे खुली करावीत, तसेच त्या कुंडांच्या माहितीचे फलक तेथे लावावेत. या दोन्ही मागण्या २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने देवस्थान समितीच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी १० फेब्रुवारीला श्री महालक्ष्मी भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सहसचिव शिवाजी साळवी यांच्याशी चर्चा करतांना दिली.
७ फेब्रुवारीला गंगावेसमधील श्री ऋणमुक्तेश्वर मंदिर येथे वरील मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याप्रमाणे १० फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयाजवळ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते एकत्रित जमले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन शिवाजी साळवी यांना देण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेचे उपायुक्त विजय खोराटे यांना दुपारी १ वाजता वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. खोराटे म्हणाले की, महानगरपालिकेच्या आरोग्याधिकार्यांना कुंडांवरील स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात येतील.
या मागण्यांच्या निवेदनात काशी कुंडाजवळील कचराकुंडी अन्यत्र स्थलांतरित करावी, काशीकुंडे पूर्णपणे स्वच्छ करून त्यातील मलनिःस्सारणाची जलवाहिनी (ड्रेनेज लाईन) काढून टाकावी, मनकर्णिका कुंडावरील बांधकाम हटवून ते भाविकांच्या दर्शनासाठी खुले करावे, काशी आणि मनकर्णिका कुंडांवर त्यांचे धार्मिक महत्त्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्याची छायाचित्रे लावावीत आणि श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात तक्रार पेटी ठेवावी, या मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी सर्वश्री गोविंद देशपांडे, देवराज सहानी, शिवसेनेचे सर्वश्री शशी बीडकर, राजू सागांवकर, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री. युवराज शिंदे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. श्री महालक्ष्मी मंदिरात काशी विश्वेश्वर मंदिर असून तेथे ‘काशीतीर्थ’ नावाचे कुंड आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक मंदिराजवळ कुंडाचे महत्त्वाचे स्थान असते.
२. काशी कुंडातील पाणी गंगेइतकेच पवित्र आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रथम काशीविश्वेश्वराचे दर्शन, त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन अशी परंपरा आहे.
३. पूर्वी या कुंडातील पाण्याने काशी विश्वेश्वरास अभिषेक घातला जात होता. उत्तर काशीप्रमाणे येथील वातावरण आणि स्थिती असल्याने या करवीर नगरीला ‘दक्षिण काशी’ अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.
४. पवित्र अशा काशी कुंडावर जाळी असून शेजारी असणार्या कचरा कंटनेरमधून त्या कुंडावर सतत कचरा पडत असतो, तसेच मलनिःस्सारणमधील (ड्रेनेज) पाणी गळतीमुळे या कुंडाचे पाणी दूषित बनले आहे.
५. हे कुंड म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. त्याची विटंबना उघड्या डोळ्यांनी पहाणे क्लेशदायक आहे. ‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून लक्षावधी भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
६. करवीर माहात्म्यामध्ये या कुंडाचे वर्णन आले आहे. अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे. पूर्वी या तीर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मी देवीच्या अभिषेकासाठी वापरले जात असे.
७. काही काळापूर्वी मनकर्णिका कुंड बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे पाप करण्यात आले. हे शौचालय पाडून टाकण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी १५ एप्रिल २०१३ या वर्षी दिला होता; मात्र या आदेशाचे पालन केले गेले नाही. देवी भक्तांच्या उद्रेकातून या शौचालयाचे अनधिकृत बांधकाम जून २०१६ मध्ये पाडण्यात आले.
अन्य उपस्थित मान्यवर…
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. किशोर घाडगे, युवा सेनेचे श्री. रणजित आयरेकर, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, उपाध्यक्ष आकाश श्री. नवरूखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधाकर सुतार, श्री संप्रदायाचे श्री. मारुती यादव, धनगर महासंघाचे श्री. यशवंत शेळके, इस्कॉनचे सर्वश्री महेंद्रकुमार साळोखे, प्रमोद जाधव आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात