जळगाव : आज आपण महाराणा प्रताप यांचा स्मृतीदिन तिथीप्रमाणे साजरा करत आहोत. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आजन्म लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे ते अजरामर आहेत. महाराणांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपणही कृती केली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे श्री. महेंद्रसिंग राजपूत यांनी केले. क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा तिथीनुसार स्मृतीदिन येथे साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराणा प्रतापांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजन करून महाराणांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘वीरपुरुषांचे स्मरण करून हिंदूंचे संघटन उभारूया’, असे आवाहन केले. या कार्यक्रमात अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, जय भवानी ग्रुप, स्वराज्य निर्माण सेना, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था या संघटनांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात