Menu Close

वसई : भूल देऊन केली जात आहे गायींची चोरी

वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातून गायींना बेशुद्ध करून चोरून नेण्याचा प्रकार उघड झाला. अशा रीतीने गायी चोरणारी टोळी या भागात सक्रिय झाल्याचेही समजते आहे. या परिसरातील गुरांचे मालक हादरले असून, परिसरातील गावागावांत संतापाची लाट उसळली आहे.

गोवंश हत्या बंदीनंतर गोवंशाची तस्करी सुरू झाली आहे. महामार्गालगत असलेल्या निर्जन भागात अनेक जण आपल्या गायी व बैल, म्हशी चरायला मोकाट सोडतात. अनेकदा ती गुरे गोठ्यात परतत नाही. अशा वेळी त्यांच्या मागावर असलेले चोरटे त्यांना बेशुद्ध करणारे इंजेक्शन देतात व ट्रकमध्ये टाकून त्यांची कत्तल करतात, असे अनेक प्रकार मागे उजेडात आले होते. या वेळी अशा तस्करांना पकडून पोलिसांच्या हवालीही करण्यात आले होते. मात्र आता तस्करांनी एअर गनने डागता येणारे इंजेक्शन मारून गायी चोरण्याचे तंत्र अवलंबले आहे. हे तंत्र बिबळ्यासारख्या हिंस्त्र श्वापदांना पकडण्यासाठी वापरले जाते. त्याचाच वापर हे चोरटे करीत आहेत.

खानिवडे गावातील नवनीत पब्लिकेशन कंपनीच्या परिसरातील जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या पाठीमागील गेटजवळ कळपाने राहणाऱ्या गायींना इंजेक्शन मारून बेशुद्ध करत पळवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा भाग महामार्गापासून लांब असल्याने व खानिवडे हनुमान नगर पाड्याच्या पाठीमागे नेमक्या वेळी कोणाची तरी चाहूल लागल्याने इंजेक्शन मारलेल्या काही गायींना तेथेच सोडून तस्कर पळून गेले. या गावात दररोज पहाटे रानात ट्रेक करणाऱ्या ग्रुपला सकाळी ६च्या सुमारास एक काळी कपिला गाय लडखडत चालत असलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर गायीच्या डाव्या बाजूच्या पायाच्या वरच्या भागाला कुठल्याशा साधनाने दुरूनच टोचता येणारे एक इंजेक्शन अर्धे औषध भरलेल्या स्थितीत लटकल्याचे आढळून आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *