मालेगांव (महाराष्ट्र) : स्थानिक गुन्हे शाखेच्या मालेगाव पथकातील अधिकारी व कर्मचारी गुरुवारी रात्री मालेगाव शहरात गस्त घालत असताना गिरणा पूल परिसरातून एका सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याने दिलेल्या कबुली नंतर अजून एक गुन्हेगार पथकाच्या ताब्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने मालेगाव गिरणा नदी पुलाजवळील गिरणा चौपाटी परिसरात रात्रभर सापळा रचून सराईत गुन्हेगार मोहम्मद शहाबाज (कमांडो मोहंमद युसूफ) (रा. गोल्डन नगर, मालेगाव) यास ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे सापडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याचे साथीदार मोहम्मद कलामोद्दीन उर्फ आरिफ मोहंमद कलामोद्दीन, (रा. मालेगाव) व एक विधी संघर्षित बालक यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी २ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी मालेगाव जुना आग्रा रोडवरील ज्ञानराज मोबाईल दुकानाचे शटर तोडून ६८ मोबाइल चोरी केल्याची पोलिसांकडे कबुली दिली. मोहम्मद कलामोद्दीन या दुसऱ्या आरोपीला मालेगाव जुना आग्रा रोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून वरील घरफोडीच्या गुन्ह्यातील ३७ मोबाइल फोन, गॅस कटर असा एकूण ५९,४७४ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात मोहम्मद कलामोद्दीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामासाठी मालेगाव छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी मोहम्मद शहाबाज याच्याविरुद्ध मालेगाव पवारवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता.
स्त्रोत : लोकसत्ता