वॉशिंग्टन : सात मुस्लिमबहुल देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला दिलेली स्थागिती उठवण्यास सॅन फ्रॅन्सिस्को येथील न्यायालयाने गुरुवारी नकार दिला असतानाच, आता तात्पुरत्या प्रवेशबंदीसाठी नवा आदेश जारी करण्याचा विचार ट्रम्प यांनी बोलून दाखवला आहे. पुढील आठवड्यात हा आदेश जारी केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
इराक, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सिरिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना ९० दिवसांसाठी आणि सर्व निर्वासितांना किमान १२० दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा आदेश ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात जारी केला होता. सिरियातील निर्वासितांसाठी तर ही प्रवेशबंदी बेमुदत काळासाठी लागू करण्यात आली होती. मात्र, या आदेशाचे अमेरिकेतच नव्हे तर जगभरात पडसाद उमटले होते.
‘आपला निर्णय हा अमेरिकन जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. न्यायालयाच्या आदेशांचा आदर राखत आम्ही आठवडाभर वाट पाहू. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहील आणि विजय आमचाच होईल, पण त्यास वेळ लागेल. त्यामुळे नवा आदेश जारी करण्याचा पर्याय आमच्यापुढे खुला असून, आम्ही तो आठवड्याभरानंतर अंमलात आणू शकतो’, असे ट्रम्प वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स