हिंदूंनो, इतर पंथीय संघटित असल्यामुळे त्यांच्याविषयी प्रशासन अशी टाळाटाळ करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !
बनबसा (उत्तराखंड) येथील प्रसिद्ध पूर्णागिरी मंदिर समितीचा आरोप
बनबसा (उत्तराखंड) : येथे रस्ता रुंदीकरणाच्या वेळी पाडण्यात आलेले प्रसिद्ध पूर्णागिरी मंदिर नव्याने बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण टाळाटाळ करत आहे, असा आरोप मंदिर समितीने केला आहे. ‘प्राधिकरणाने मंदिर बांधून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी मंदिर समितीने दिली आहे.
मंदिर समितीचे सदस्य विमला सजवान म्हणाले, ‘‘जेव्हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पुरातन पूर्णागिरी मंदिर पाडण्यात आले, तेव्हा त्यांनी टनकपूर येथील उपविभागीय न्यायाधिशांच्या उपस्थितीत मंदिराच्या उर्वरित भूमीवर भव्य मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाकडे प्राधिकरण दुर्लक्ष करत असून त्या जागेवर लहानसे मंदिर बांधणार असल्याचे सांगत आहे.’’
प्राधिकरणाचे संचालक अजय बिश्नोई म्हणाले, ‘‘याविषयी बनबसा येथे आल्यावरच मला माहिती मिळाली. मंदिर बांधकामाविषयी समितीच्या पदाधिकार्यांसह बसून निर्णय घेण्यात येईल.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात