देवतांच्या प्रतिमा काढण्याचा फतवा काढणार्यांची चौकशी आणि मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याचा आदेश देणार्यांचे निलंबन, हा कुठला न्याय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : १४ फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे या पाश्चात्त्य परंपरेचे आचरण न करता मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करावा आणि भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा स्मृतीदिन साजरा करावा, असे परिपत्रक काढले; म्हणून सोलापूरचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. तानाजी घाडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना त्वरित निलंबित केले गेले. क्रांतीकारक आणि माता-पिता यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेणे, हाच काय तो श्री. घाडगे यांचा गुन्हा ? क्रांतीकारकांच्या स्मृतीदिनाच्या दिनांकाची तांत्रिक चूक सुधारूनही भारतीय संस्कारवृद्धी करणारा निर्णय शासनाला घोषित करता आला असता. एकीकडे शासकीय कार्यालयांतील देवतांच्या प्रतिमांवर बंदीचा फतवा काढणार्यांची केवळ (दिखाऊ) चौकशी करायची आणि दुसरीकडे क्रांतीकारक आणि माता-पित्यांचा सन्मान करा, असे म्हणणार्यांवर निलंबनाची कारवाई करायची, हा कुठला न्याय ? शासनाने श्री. तानाजी घाडगे यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे आणि देवतांच्या प्रतिमांवर बंदीचा फतवा काढणार्यांवर काय कारवाई केली, हेही जनतेला सांगावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की,
१. परिपत्रकातील तांत्रिक चुकीच्या संदर्भात श्री. घाडगे यांना निश्चित जाब विचारता येईल; मात्र त्यांच्या उद्देशाला कसे चुकीचे म्हणता येईल ?
२. यापूर्वी भाजपशासित मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ पूजन दिवस शासकीय स्तरावर साजरा केला जात होता, हे कसे विसरता येईल ?
३. वास्तविक शासनाने युवापिढीला वासनांधतेच्या दरीत लोटणार्या आणि अनैतिक कृत्यांना बळ देणार्या व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्चात्त्य कुप्रथांना रोखण्यासाठी कृती करण्याची आवश्यकता आहे.
४. शासनाला सनबर्न पार्टी चालते, ३१ डिसेंबरला मद्यपानासह धांगडधिंगा चालतो, पोर्न वेबसाइटस् पाहिलेल्या चालतात; मात्र माता-पित्यांचे पूजन चालत नाही ! ही महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे का ?
५. महाराष्ट्र शासन छत्रपतींचा आदर्श मानते कि तथाकथित व्हॅलेंटाईनचा ? असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात