जळगाव : मालेगाव (नाशिक) येथील गोरक्षणाचे कार्य करणारे बजरंग दलाचे श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर गोतस्करांकडून झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांधांवर त्वरित अन् कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले.
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असूनही अवैधरित्या गोवंशांची तस्करी, तसेच गोरक्षकांवरील वाढती आक्रमणे हा चिंतेचा विषय आहे. त्यातच गोरक्षकांवरच गुन्हे प्रविष्ट केले जातात, ही गोष्ट जनतेच्या मनात प्रशासनाविषयी शंका उपस्थित करणारी आहे. गोरक्षकांना कायदेशीर संरक्षण मिळावे आणि गोवंशहत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केली जावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, जय भवानी ग्रुप, स्वराज्य निर्माण सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात