भारतविरोधी अहवालाचा अमेरिकेतील हिंदू निषेध करतात; पण भारतविरोधी घटनांविषयी भारतातील हिंदू मात्र साधा निषेधही करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगावर (यु.एस्.सी.आय.आर.एफ.) हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने प्रखर टीका केली आहे. ‘सातत्याने काश्मिरी फुटीरतावाद्यांची बाजू घेणार्या मूळ पाकिस्तानी वंशाचे भारतद्वेष्टे सामाजिक कार्यकर्ते इक्तिदार किमा यांचा भारतविरोधी अहवाल प्रकाशित करून ‘यु.एस्.सी.आय.आर.एफ.’ या आयोगाने विश्वासार्हता गमावली आहे’, असे ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने म्हटले आहे.
इक्तिदार किमा यांची भारतद्वेष्टी पार्श्वभूमी
मूळ पाकिस्तानी वंशाचे इंग्लंडचे सामाजिक कार्यकर्ते इक्तिदार किमा हे इंग्लंडमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अॅण्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट’चे संचालक आहेत. ‘भारतात अल्पसंख्यांक आणि दलित यांना भेदभाव आणि छळाला सामोरे जावे लागते. भारतातील घटनात्मक तरतूदी, तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांचे कायदे राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या आतंरराष्ट्रीय मानकांनुसार नाहीत’, असा तथ्यहीन आरोप इक्तिदार चिमा यांनी त्यांच्या अहवालात केला आहे. ‘किमा हे जम्मू-काश्मीरला भारतापासून विलग करू पहाणार्या शक्तींना साहाय्य करत आहेत. काश्मीरमधून वशंविच्छेद करण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंचा किमा कधीच उल्लेख करत नाहीत. शीख फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारी अनेक वक्तव्ये किमा यांनी केली आहेत. त्यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या खलिस्तानला पाठिंबा देणार्या शिख फुटीतावाद्यांच्या सभेलाही संबोधित केले होते. त्या सभेत किमा यांनी भारत आणि अमेरिका या देशांनी बंदी घातलेल्या ‘बब्बर खालसा’ या आतंकवादी संघटनेला पाठिंबा दिला होता. अशा व्यक्तीचा अहवाल प्रसिद्ध करण्यास यु.एस्.सी.आय.आर.एफ.ने उगाच अनुमती दिली आहे’, असे हिंदु अमेरिकन फाऊंडेशनच्या सुहाग शुक्ला यांनी त्यांच्या ‘ब्लॉग’मध्ये म्हटले आहे.
अमेरिकी संस्थेचा भारतद्वेष
भारतात धर्मांतर करणार्या अमेरिकेतील चर्चची यु.एस्.सी.आय.आर.एफ. का बाजू मांडते ?, असा प्रश्नही सुहाग शुक्ला यांनी उपस्थित केला आहे. ‘भारतासारख्या जगातील मोठी लोकशाही असणार्या निधर्मी देशाला अफगाणिस्तान, टर्की, रशिया आदी दुय्यम देशांच्या सूचीत टाकणारी यु.एस्.सी.आय.आर.एफ.ही पहिली अमेरिकेतील शासकीय संस्था आहे’, असे सुहाग शुक्ला यांनी म्हटले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात