-
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
-
हिंदु धर्म, रूढी, परंपरा यांवर टीका न करण्याविषयी पोलिसांची आयोजकांना नोटीस !
कागल (जिल्हा कोल्हापूर): येथील मुक्तबंध विचारमंच आणि अक्षर मानव या संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंदु धर्म, देवता, संत, रूढी, परंपरा यांवर कोणतीही टीका करून जातीय तेढ निर्माण करू नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची नोटीस १५ फेब्रुवारीला पोलिसांनी या कार्यक्रमाच्या संयोजकांना बजावली आहे.
वरील दोन्ही संघटनांच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. मुक्तबंध विचारमंच आणि याच्याशी संलग्न संघटना गेल्या ४ वर्षांपासून समाजात सतत जातीय तेढ निर्माण करणारे कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे ही संपूर्ण व्याख्यानमाला रहित करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने १५ फेब्रुवारीला पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. गुप्त वार्ता विभागातील पोलीस हवालदार पोवार यांना हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिलेे होते.
या वेळी निवेदन देतांना शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, वाहतूक सेनाप्रमुख श्री. म्हाळू करिकट्टे, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रीतम पोवार, किरण दुसे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी पोलीस हवालदार पोवार यांनी हिंदुत्वनिष्ठांशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर पोवार यांनी पोलीस निरीक्षक एस्.जी. भांबुरे यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाच्या संयोजकांना नोटीस पाठवली.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. वर्ष २०१५ मध्ये मुक्तबंध विचारमंच आणि इतर संघटनांनी मिळून सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम हे नाटक आयोजित केले होते. हे नाटक जातीय तेढ निर्माण करणारे असल्याने या नाटकाला सेन्सॉरची मान्यता नव्हती. त्याला पोलिसांनी अनुमती दिलेली नव्हती.
२. १ जानेवारी हा दिवस शौर्यदिन साजरा करा, या संदर्भातील १ फलक (होर्डिंग्ज) कागल शहरात लावण्यात आले होते. त्यामध्ये १ जानेवारी शौर्य दिन साजरा करा, कारण १ जानेवारी १८१८ ला ५०० महारांनी २५ सहस्र पेशव्यांची हत्या केली, असे जातीय तेढ निर्माण करणारे फलक विनाअनुमती लावण्यात आले होते. हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ते फलक उतरवले.
हिंदुत्वनिष्ठांनी कठोर भूमिका घेतल्याने पोलिसांनी आयोजकांना नोटीस पाठवली !
हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तरी प्रारंभी पोलिसांनी कार्यक्रम रहित करण्याविषयी आडमुठपणाची भूमिका घेतला होती. पोलीस हवालदार पोवार म्हणाले, या कार्यक्रमात स्त्री-पुरुष समता आणि आपण पुरुष हा विषय असल्याने कोणते कारण देऊन कार्यक्रम बंद करायला लावायचे. (प्रतीवर्षी जातीय तेढ निर्माण करणारे कार्यक्रम सादर केले जात असतांनाही या वर्षी हा कार्यक्रम बंद करण्यासाठी कारण शोधणे कितपत योग्य ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याला उत्तर देतांना शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी म्हणाले, कार्यक्रमात असा जरी विषय असला, तरी स्त्री आणि पुरुष यांतील समस्या हिंदु धर्मामुळे निर्माण झाली आहे, असे त्यांचे वक्ते जाहीरपणे कार्यक्रमात सांगतात. त्यामुळे नुसते विषयाकडे पहाण्यापेक्षा कार्यक्रमात हिंदु धर्मावर टीका होत असल्याने तो रहित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे हिंदुत्वनिष्ठांनी कठोरपणाची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस पाठवली. तसे पोलिसांनी श्री. किरण कुलकर्णी यांना संपर्क करून कळवले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात