अंदाधुंद गोळीबार ;२५ ठार, ५० जखमी
तेहरीक-ए-तालिबानने जबाबदारी स्वीकारली
पेशावर : हिंदुस्थानात रक्तपात घडविण्यासाठी दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानवरच पुन्हा दहशतवादाचा भस्मासुर उलटला. तेहरीक-ए- तालिबानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना टार्गेट करून पेशावरनजीक बाचा खान विद्यापीठात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यात किमान २५ जण ठार आणि ५० वर गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांशी विद्यार्थी आहेत. पाक सैनिकांनी विद्यापीठात कारवाई करून चार दहशतवाद्यांना ठार केले. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकला जबरदस्त हादरा बसला असून पालक आणि विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
सैनिक दाखल; पालकांचा आक्रोश
हल्ल्याचे वृत्त चॅनल्सवर झळकताच पाकमध्ये खळबळ उडाली. पालकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. आपला मुलगा, मुलगी सुरक्षित असेल का या चिंतेने आक्रोश केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता न आल्याने अखेर पाक लष्कराचे सैनिक विद्यापीठात आले. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनेही घिरट्या घातल्या. दुपारी बारापर्यंत दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता. पाक लष्कराने परिसरातील गावांमधून ऑपरेशन सुरू केले. दुपारी दीडपर्यंत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, मात्र विद्यापीठ परिसरात आणखी आठ ते दहा दहशतवादी असण्याची शक्यता आहे.
वजिरीस्तानमधील हल्ल्याचा बदला
तेहरीक-ए-तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तालिबानचा कमांडर उमर मन्सूर याने पाक सैन्याकडून वजिरीस्तानात तालिबान्यांवर होत असलेल्या कारवाईचा बदला घेतल्याचे म्हटले आहे. यापुढेही असेच हल्ले करू अशी धमकी त्याने दिली आहे.
विद्यार्थ्यांचे प्राण वाचविणारा प्राध्यापक ठार
हल्ला झाला तेव्हा रसायनशास्त्राचे प्राध्यापक सय्यद हामीद हुसेन यांनी मोठ्या हिमतीने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचविल्याचे वृत्त पाक मीडियाने दिले आहे. आपल्याजवळील पिस्तूलने सय्यद हामीद यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गाबाहेर काढले, मात्र दहशतवाद्याने थेट हामीद यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना ठार केले.
धुक्याने केला घात
आज पेशावर परिसरात थंडीची लाट आणि धुके होते. सकाळी नऊच्या सुमारास मुलांच्या हॉस्टेलच्या संरक्षक भिंतीवरून दहशतवादी विद्यापीठ कॅम्पसमध्ये घुसले. ज्या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू होता त्या सभागृहात सैनिकी वेशातील दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडे एके-४७ रायफल्स होत्या. ग्रेनाइड बॉम्बचेही स्फोट केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी सैरभैर धावू लागले. अनेक विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये आणि टॉयलेटमध्ये प्राण वाचविण्यासाठी कोंडून घेतले. हॉलमध्ये अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले. त्यानंतर दहशतवादी रसायनशास्त्र प्रयोगशाळेत घुसले आणि गोळीबार केला. दहशतवाद्यांनी विद्यापीठ इमारतीच्या छतावरूनही गोळीबार करीत बॉम्ब फेकले. – डिसेंबर २०१४ मध्ये पेशावरच्या आर्मी स्कूलमध्ये तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी रक्तरंजित हिंसाचार केला होता. त्यात १३२ विद्यार्थ्यांसह १५० जण ठार झाले होते. त्या हल्ल्याची पुनरावृत्ती आज झाली. पेशावरपासून ५० किमीवर चारसदा येथे खान अब्दुल गफार खान यांच्या नावाने बाचा खान विद्यापीठ आहे. २०१२ मध्ये उच्च शिक्षणासाठी स्थापन झालेल्या या विद्यापीठात खान अब्दुल गफार खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मुशायराचा कार्यक्रम आयोजित केला होता. तब्बल तीन हजार विद्यार्थी, प्राध्यापक आणि ६०० पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
संदर्भ : सामना