Menu Close

‘लव्ह जिहाद’ची परिणती दंगलीत !

उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे १० फेब्रुवारीला १७ वर्षांच्या हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केली. वरवर पहाता ‘निवडणुकीच्या विषयावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हत्येत झाले’, असे दाखवण्यात येत असले; तरी प्रत्यक्ष मात्र १६ सप्टेंबर २०१६ या दिवशी येथील एका गावात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या ३ वासनांधांची हत्या करण्यात आली होती, त्याचा सूड उगवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे; कारण हिंदु तरुणाची हत्या करणार्‍यांपैकी काही जण त्या वासनांधांचे नातेवाईक आहेत.

दहा वर्षांपूर्वीपासूनच भारतभर हिंदु-मुसलमान प्रेमप्रकरणे आणि विवाह हे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र असल्याचे उघडकीस येवू लागले होते; मात्र त्या वेळी असा शब्द उच्चारणेही माध्यमांसाठी धाडसाचे होते. तारा सचदेव या आंतरराष्ट्रीय खेळाडूने ती ‘लव्ह जिहाद’चा बळी असल्याचे सांगितल्यावर राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी या शब्दासह हा विषय उचलून धरला आणि आता वाहिन्यांवर लघुपट दाखवून याविषयीच्या चर्चा चालू झाल्या आहेत. ‘जय महाराष्ट्र’, ‘आयबीएन् ७’ आणि ‘झी चोवीस तास’ यांनी हे विषय चांगल्या प्रकारे हाताळले, तर ‘एनडीटीव्ही’नेही भीतभीत का होईना पुरोगामी पद्धतीने या विषयाला हात घातला. वाहिन्यांनी आंतरधर्मीय विवाहाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून होणारी फसवणूक मात्र गंभीर असून त्याचा तीव्र निषेध केला. त्यामुळे मोदी सरकार आल्यामुळेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ‘घरवापसी’, ‘राममंदिर’ याप्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हे सूत्र उपस्थित केले जात आहे, या निधर्मीवाद्यांच्या टीकेचा फोलपणा उघड झाला. मोदी शासन आल्यावर प्रत्यक्ष गृहमंत्र्यांनीही ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केल्याने हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळले जाऊन ते अतिशय दुखावले गेले; कारण थोडेथोडके नव्हे, तर लक्षावधी हिंदू यात होरपळून निघाले आणि निघत आहेत. ‘सनातन प्रभात’, ‘सामना’, ‘पांचजन्य’ या वृत्तपत्रांतून आणि ‘ऑर्गनायझर’मधून ‘लव्ह जिहाद’चे काही ठोस पुरावे देण्यात आले; मात्र हे अपवाद वगळता अन्य सर्व माध्यमे समाजवादी आणि निधर्मी असल्याने हा विषय उचलायला सिद्ध नव्हती. तरीही मधल्या काळात प्रत्यक्ष हिंदु जनता ते घाव सोसत असल्याने त्याचे पडसाद समाजमनावर उमटत राहिले. काही वेळा समाजात प्रतिक्रियात्मक असे गंभीर पडसाद उमटूनही प्रसारमाध्यमांनी त्याची नोंद घेतली नाही; पोलीस, निधर्मी आणि राजकारणी यांच्याकडून हिंदूंवर दबाव येऊन त्यांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागला. हिंदुबहुल देशात हिंदूंवर होत असलेल्या अनेक घोर अन्यायांपैकी हा एक आहे. असे असले, तरी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या दहा वर्षांच्या काळात नेटाने हा विषय लावून धरला आणि त्यांच्या स्तरावर जनजागृती केली.

विविध घटनांतून पुढे आलेले वास्तव

काही वर्षांपूर्वी मुंबईत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या एका युवतीने पत्रकार परिषद घेऊन हा विषय चव्हाट्यावर आणला; खरे तर ती ‘ब्रेकिंग न्यूज’ होती; परंतु तेव्हाही माध्यमांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नव्हता. २०१२ मध्ये ठाण्यातील हिंदु जागृती गणेशोत्सव मंडळाने या विषयावरचा देखावा केला. त्या वेळी ते प्रकरण अक्षरशः मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले आणि ‘मुसलमानांना वाईट वाटेल म्हणून ‘लव्ह जिहाद’ म्हणू नका’, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात २००६ मध्येच न्यायमूर्ती राकेश शर्मा यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केंद्रीय गृह मंत्रालयाला आयबीद्वारे अशा प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते; पण यावर पुढे काहीच पावले उचलली गेली नव्हती. २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपिठापुढे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. शशिधरन् नंबियार यांनी ‘लव्ह जिहाद’ची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या याचिकेत चार वर्षार्ंच्या कालावधीत ४ सहस्र प्रकरणे घडल्याचे म्हटले होते. आता मात्र गणेशोत्सव मंडळे अधिक धीट झाली आहेत. सांगरूळ येथील बलभीम तालीम मंडळाने ‘लव्ह जिहाद’चे दाहक वास्तव दाखवणारे नाटकच ‘जिवंत देखावा’ म्हणून सादर केले. केरळप्रमाणेच उत्तरप्रदेशच्या पश्चिमी भागात ‘लव्ह जिहाद’चे दाहक वास्तव वारंवार सामोरे येत असल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या विरोधात गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जागृती करण्यास प्रारंभ केला. रा.स्व. संघाने तिथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनजागृतीची मोठी मोहीम राबवली. प्रवीण तोगाडिया यांनी ‘लव्ह जिहाद’मध्ये सक्रीय असणार्‍या धर्मांध मवाल्यांवर आर्थिक बहिष्कार टाका’, असे आवाहन केले. वर्ष २०११ मध्ये जामनेर तालुक्यातील पहूर येथे धर्मांधांनी हिंदु तरुणीस पळवल्यावरून सर्व पक्षांनी बंद पाळला होता. कारंजा (वाशीम) येथेही अशा आंतरधर्मीय प्रेमविवाहातून दंगल होऊन एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण घायाळ झाले. वर्ष २०१३ मध्ये मुझफ्फरनगरची दंगल ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणावरूनच झाली होती. महाराष्ट्रात कराड येथे २८ मे २०१६ या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणावरून काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढण्यात आला. त्यात सहस्रो नागरिक सहभागी झाले होते. वरील सर्व घटनाक्रम सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, आतापर्यंतचा लव्ह जिहाद हा एका मुलीशी, एका कुटुंबाशी आणि तिच्या नातेवाइकांशी सिमीत रहात होता. या घटनांचे प्रमाण आता प्रमाणाबाहेर गेल्याने त्याचे दंगलींत रूपांतर होऊ लागले आहे. धर्मांध हिंदूंच्या हत्या करत आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हिंदुत्वनिष्ठ जागरूक आहेतच. शासन आणि प्रशासन यांनी हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत न पहाता अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *