२० हिंदुत्वनिष्ठ पोलिसांच्या कह्यात आणखी ३ मंदिरेही पाडणार
मोगलांची आठवण करून देणारी राजस्थान सरकारची कारवाई ! सरकारने अशी कारवाई कधी अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर केल्याचे ऐकिवात आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जयपूर : भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कारवाई पूर्ण करून मंदिरातील मूर्ती ट्रकमध्ये ठेवून त्या अन्यत्र हालवण्यात आल्या. या विरोधात संघटित होणार्या रा.स्व. संघाशी संबंधित ‘मंदिर बचाओ संघर्ष समिती’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. राजस्थान सरकारने मेट्रोचे कारण पुढे करत यापूर्वीही हिंदूंची प्राचीन मंदिरे पाडली आहेत.
(म्हणे) ‘मंदिरांसह विकासाचीही आवश्यकता !’ – भाजपच्या मंत्र्यांचे अश्लाघ्य समर्थन
या कारवाईविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मंत्री अरुण चतुर्वेदी म्हणाले, ‘‘अनेकदा अशी स्थिती येते की, मंदिरे पुनर्स्थापित केली जातात. राज्यात मंदिरांसह विकासाचीही आवश्यकता आहे.’’
जिल्हा प्रशासनाने प्रथम बाईजी मंदिरासमोरील महादेव, माताजी आणि हनुमान यांच्या ३ मूर्ती हटवल्या. या मूर्ती अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर येथील गणेश-शिवजी मंदिर हटवण्याची कारवाई चालू करण्यात आली. हे मंदिर आता माणक चौकाच्या मागे असलेल्या सरकारी भूमीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. ही दोन्ही मंदिरे हटवण्याच्या कारवाईसाठी सकाळपासूनच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा नियुक्त करण्यात आला होता.
२० हिंदुत्वनिष्ठ कह्यात
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रथमपासूनच ही मंदिरे हटवण्यास विरोध करत होत्या. १५ फेब्रुवारीलाही मंदिर पाडण्यास विरोध करणार्या येथील ‘धरोहर बचाओ समिती’ या संघटनेचे श्री. भारत शर्मा यांना कह्यात घेऊन शिवदासपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर लाल सेना, भारतीय हिंदु सेना, करणी सेना आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही कह्यात घेण्यात आले. पोलिसांनी या सर्वांना एका ठराविक परिसराच्या पुढे येऊच दिले नाही. त्यानंतरही मंदिर पाडण्यास विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात प्रचंड धक्काबुक्की झाली. यानंतर २० हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेण्यात येऊन त्यांना जयपूरपासून दूर शिवदासपुरा येथे नेऊन सोडण्यात आले.
आणखी ३ मंदिरांवर टांगती तलवार
मेट्रोच्या मार्गात येणारी आणखी ३ मंदिरे हटवणे शेष आहेे. यांमध्ये माणक चौक येथील महादेव मंदिर, जमनेश्वर मंदिर आणि उत्तर-पश्चिम ध्रुवमुखी महावीर हनुमान मंदिर या मंदिरांचा समावेश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात