घाटकोपर : येथे श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
आयोजक श्री. सुनील दुबे म्हणाले, ‘‘सध्या देशात स्वतःच्या अपत्यांकडून देखभाल होत नसलेल्या वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आधुनिकतेच्या प्रभावामुळे या नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक समस्येविषयी शासनही चिंतित आहे; मात्र मातृ-पितृ पूजन दिनासारख्या उपक्रमातून आपल्या माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’
प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. पारस राजपूत म्हणाले, ‘‘व्हॅलेंटाईन डे साजरा करणे, म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण अन् हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन होय ! पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण आपली संस्कृती सोडत आहोत. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी हे हिंदु संस्कृतीवरील आक्रमण ओळखून या दिवशी मातृपितृ पूजन दिन साजरा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे लाखो भाविक या दिवशी मातापित्यांचे पूजन करत आहेत. एकप्रकारे ‘व्हॅलेंटाइन डे’च्या कुप्रथेला आळा घालण्याचेच काम करत आहेत.’’
ब्राह्मण एकता सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. अखिलेश तिवारी यांनी सांगितले, ‘‘सनातन हिंदु धर्मातील सण हे नैतिकता आणि सदाचार शिकवतात तर ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्चात्त्य प्रथा अनैतिकता आणि अनाचार शिकवतात.’’ सध्या षड्यंत्रपूर्वक सनातन हिंदु धर्म आणि संत यांवर आक्रमणे होत आहेत. सरकार कुणाचेही असो, हिंदू आता अन्याय सहन करणार नाहीत. संपूर्ण भारतभर याचे प्रतिसाद उमटतील.’’
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी म्हणाले, ‘‘शासनाने मातृ-पितृ दिवस पूजनाचा आदेश काढणार्या श्री. तानाजी घाटगे यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे, तसेच देवतांच्या प्रतिमांवर बंदीचा फतवा काढणार्यांवर काय कारवाई केली, हेही महाराष्ट्र शासनाने जनतेला सांगावे.’’
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात