जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी या विषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी करून घेण्याची विनंती केली होती. त्या वेळी त्यांनी ‘आम्हाला अशा स्वयंस्फूर्तीने कार्य करणार्यांची आवश्यकता आहे’, असे सांगितले होते आणि १८ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या ३ सदस्यांना जिल्हास्तरीय समितीमध्ये आणि ६ सदस्यांना तालुका स्तरावरच्या समितीमध्ये सहभागी करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे सांगितले. या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातून समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. चोपडा, एरंडोल, जामनेर, भुसावळ, पाचोरा, पारोळा या तालुक्यांमध्ये समितीच्या सदस्यांना सहभागी करण्यात आले आहे. (हिंदु जनजागृती समितीवर विश्वास दाखवून समितीच्या सदस्यांना जिल्हा आणि तालुका यांच्या स्तरावरील समित्यांमध्ये सहभागी करून घेणार्या जिल्हाधिकार्यांचे अभिनंदन ! – संपादक)
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अन्य ५ जिल्हास्तरीय प्रशासकीय अधिकारी असलेल्या समितीमध्ये कु. प्रतिक्षा कोरगावकर, सर्वश्री उदय बडगुजर, श्रेयस पिसोळकर यांना सहभागी करण्यात आले आहे, तर प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार, पोलीस निरीक्षक सदस्य असलेल्या समितीमध्ये तालुकानिहाय सर्वश्री यशवंत चौधरी, विनोद शिंदे, डॉ. रवींद्र पाटील, हिरामण वाघ, हेमराज पाटील आणि सौ. रेखा जाधव यांना सहभागी करण्यात आले आहे.
४ जानेवारी या दिवशी निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधनासाठी तयार केलेली ध्वनिचित्र चकती दाखवण्यात आली होती. श्री. मुंडके यांनी सर्व तहसीलदारांना आदेश पाठवण्यास सांगितले होते की, २६ जानेवारी निमित्त होणार्या कार्यक्रमांमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान’ या विषयासाठी १० मिनिटे देण्यात यावीत.
१८ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी सौ. रूबल अग्रवाल यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय समितीला दिलेल्या आदेशाची प्रत समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. या आदेशामध्ये ‘वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांद्वारे राष्ट्रध्वजाच्या उचित वापराविषयी प्रसिद्धी देण्यात यावी. खराब झालेले आणि माती लागलेले राष्ट्रध्वज जमा करण्यासाठी अन् त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती तात्काळ सादर करावी. शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे अनुपालन होईल, याची निश्चिती करावी’, असे आदेश देण्यात आले आहेत.