मुंबई : वेद हे विज्ञानसंपन्न आहेत. वेदांमधील श्लोकांमध्ये विज्ञान बिंबले आहे. त्यामुळेच आधुनिक विज्ञानाची पाळेमुळे वेदांमध्ये आहेत. आधुनिक वैज्ञानिक होण्याचे ध्येय ठेवणार्या युवकांनी प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास केला, तर त्यांच्यासाठी विज्ञानाची अनेक क्षितिजे उघडी होतील, असे प्रतिपादन समुद्रशास्त्रज्ञ डॉ. अरविंद उंटवाले यांनी केले. मुंबई विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या भारतीय युवा विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. अरविंद उंटवाले यांनी युवकांना केलेल्या मार्गदर्शनातील महत्त्वपूर्ण सूत्रे
१. प्राचीन इतिहासाचा आणि ऋषि-मुनी यांनी केलेल्या कार्याचा समाजाने सखोल विचार केला पाहिजे. ऋषि-मुनी यांनी हे ज्ञान ध्यानातून प्राप्त केले आहे. वेदांमधील श्लोकांचा केवळ वरवर विचार करू नका.
२. तरुण वैज्ञानिक प्राचीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी उदासीन आहेत, हे दुर्दैवी आहे. वेदांमधील ज्ञान हे सांकेतिक लिपीत आहे. त्यामुळे ते सर्वांना लक्षात येत नाही. विज्ञानात प्रगती करत पुढे जायचे असले, तरी इतिहास विसरता कामा नये. संस्कृतचा अभ्यास करून वेदांची सांकेतिक भाषा सर्वसामान्यांना भाषांतरित करून दिल्यास वेदांच्या महती लक्षात येईल. ग्रहांची प्राचीन, अर्वाचीन आणि भविष्यातील परिक्रमा केवळ वेदाभ्यासानेच कळते. ग्रहांच्या स्थितीसह अनेक विषय वेदांमधून शिकण्यासारखे आहेत.
३. आधुनिक वैज्ञानिक वेदांच्या संदर्भात अनभिज्ञ आहेत; कारण त्यांना संस्कृत येत नाही. त्यांनी वेद वाचलेलेही नाहीत. ‘वेदांमध्ये वैज्ञानिक माहिती अतिरंजित करून दिली आहे’, असे काही वैदिक अभ्यासकांना वाटत असले, तरी वेदांमध्ये अनेक तात्त्विक समीकरणे आणि शास्त्रीय ज्ञानाच्या कक्षेबाहेर असलेल्या विविध विषयांवर सखोल ज्ञान आहे. ऋषींनी ध्यानातून शक्ती प्राप्त करून परग्रहांवरही जाऊन आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात