वसुसायगाव (जिल्हा संभाजीनगर) येथील हिंदु धर्मजागृती सभा
संभाजीनगर : आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना निधर्मी (सेक्युलर) दाखवणे, ही इतिहासाशी प्रतारणा आहे. यासाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंनीही आता धर्मशास्त्रानुसार धर्माचरण करून आपल्यातील धर्मतेज जागृत केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. येथील वसुसायगाव (जिल्हा संभाजीनगर) येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. छाया देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेला गावातील २७५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेमध्ये समितीचा परिचय श्री. किशोर जगताप यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन कु. चैताली डुबे यांनी केले. या वेळी कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा दिली.
क्षणचित्रे
१. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीला ४९ धर्माभिमानी उपस्थित होते.
२. धर्माभिमान्यांनी गावामध्ये धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. गावातील धर्माभिमानी युवक हे सक्रिय कृतीशील आहेत. त्यांनी स्वतःहून आजूबाजूच्या ८ गावांमध्ये सभेचा प्रसार करून आयोजन केले. त्या युवकांनी सभेच्या दिवशी सकाळी वाहनफेरी काढून सभेविषयी जनजागृती केली.
२. सभेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पटांगणावर करण्यात आले होते. ऐनवेळी त्या ठिकाणची अनुमती नाकारण्यात आली होती. असे असतांना त्या युवकांनी अन्य ठिकाणी सभा घेऊन सभा यशस्वीपणे पार पडली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात