अहमदनगर : शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारी रोजी चौथ-यावर प्रवेश करून आंदोलन करण्याचा निर्धार पुणे येथील भूमाता रणरागिणी संघटनेने जाहीर केला आहे. त्यामुळे भूमाता संघटनेच्या महिलांना चौथ-यावर प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने मुख्य मंदिर परिसरात महिला पोलीसांसहीत पोलीस संरक्षण उपलब्ध द्यावे, अशी मागणी शनैश्वर देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी केली आहे.
अनिता शेटे यांनी देवस्थानच्या सर्व विश्वस्तांसहीत अहमदनगर येथे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन त्यांना या विषयाबाबतचे लेखी निवेदन सादर केले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी देखील यावेळी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला चौथ-यावर प्रवेश करून शनिदेवांचे दर्शन घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भूमाता रणरागिणी संघटनेने दिल्यापासून चौथ-यावर प्रवेश करणा-या महिलांच्या विरोधात परिसरातील महिला तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे शनिशिंगणापूरमधील वातावरण गेले काही दिवस चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून त्यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा केली.
२६ जानेवारीला भूमाता संघटनेच्या ४०० महिला चौथ-यावर प्रवेश करण्याचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.महिलांना चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यास शनिशिंगणापूरमध्ये मनाई आहे. महिलांनी चौथ-यावर जाऊन दर्शन करणे हे धार्मिक परंपरेच्या विरोधात आहे. त्यामुळे या महिलांना विरोध करण्यासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने पुढे आल्या असून त्यांनी २६ जानेवारी रोजी शनिदेवांच्या चौथ-या भोवती मानवी कडे करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीत शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारी रोजी मंदिर परिसरातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता असल्याने मुख्य मंदिराच्या परिसराला मोठे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे.
दरम्यान शनिशिंगणापूर येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असून आवश्यक ते सर्व संरक्षण देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी कवडे यांनी सांगितले.
संदर्भ : डेली हंट