Menu Close

संभाजीनगर आणि नगर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचा विविध कार्यक्रमांत सहभाग !

संभाजीनगर : येथील सायगाव, नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मी गाव आणि अवघड पिंपरी येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता.

सायगाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची टाळ-मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धर्माभिमानी अधिवक्ता शंकर जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. किशोर जगताप यांनी शिवजयंतीनिमित्त शौर्यजागरण, तर अधिवक्ता शंकर जाधव यांनी शिवचरित्र आणि आदर्श हिंदु राष्ट्र या विषयावर उपस्थित १०० धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे महत्त्व सांगितल्यावर धर्माभिमान्यांनी पुढच्या वर्षीपासून त्यानुसार कृती करणार असल्याचे सांगितले.
२. अनेकांनी हिंदु राष्ट्राच्या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याचे सांगितले.

ब्राह्मी गाव

येथे शिवजयंती उत्सव, ब्राह्मी यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी सिद्ध केलेली महाराजांवरील शौर्यगीते लावली होती. मिरवणुकीच्या सांगतेप्रसंगी समितीचे श्री. नागेश जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. त्यानंतर एका बालधर्माभिमान्याने शौर्यगीत सादर केले. या वेळी श्री. जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि शौर्य या विषयावर मार्गदर्शन करतांना संसदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली. कार्यक्रमाची सांगता शिवरायांचे आठवावे रूप या गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला २५० हून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.

वैशिष्ट्यपूर्ण

प्रतिवर्षी शिवजयंती उत्सव, ब्राह्मी यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे ध्वनीक्षेपकावर चित्रपटातील अश्लील गाणी लावली जायची. त्यावर अनेक जण मद्यपान करून नाचायचे. अशा अयोग्य पद्धतीने साजरी केली जाणारी शिवजयंती यंदाच्या वर्षी वरील पद्धतीने साजरी करण्यात आली. (अपप्रकारांना सोडून चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवजयंती उत्सव, ब्राह्मी यांचे अभिनंदन ! – संपादक)

अवघड पिंपरी

येथील मराठा एकीकरण समितीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी अग्रस्थानी धर्मध्वज, एका रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आणि पारंपरिक वाद्यांचा सहभाग होता. या वेळी समितीच्या कु. प्रियांका लोणे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अरुण ठाणगे यांचा सहभाग होता. या मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात कु. लोणे यांनी वाढता लव्ह जिहाद, धर्मांतर, जातीयवाद आणि हिंदु धर्मावर होत असलेले आघात यांविषयी प्रबोधन केले. या वेळी ३०० हून अधिक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

प्रतिवर्षी काढण्यात येणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये डीजे ध्वनीक्षेपक लावले जायचे. यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्ये वापरण्यात आली होती. तसेच ग्रामस्थांनी कु. लोणे यांनी मांडलेला विषय ऐकून मराठा एकीकरण समिती हे नाव पालटून हिंदू एकीकरण समिती करणार असल्याचे ठरवले. त्याद्वारे येथून पुढे हिंदूंचे एकीकरण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *