फोंडा : पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली आजची पिढी असली, तरी या संस्कृतीमुळे आपल्या पिढ्यांची पुढे हानी होणार आहे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योती सुदिन ढवळीकर यांनी कवळे शाळा समूहाच्या वतीने आयोजित २८ व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळ्यात केले. ढवळी, फोंडा येथे श्री भगवतीदेवीच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात सौ. ढवळीकर प्रमुख पाहुण्या होत्या.
या वेळी व्यासपिठावर विशेष अतिथी मराठी राजभाषा युवा समितीचे श्री. मच्छींद्र च्यारी, कवळेच्या उपसरपंच सौ. सुनीता नाईक, मुख्याध्यापक
श्री. श्रीकृष्ण देसाई, श्री. सुदेश पारोडकर, सौ. संपदा (शेवंती) नाईक आणि शाळा समूहाच्या गटप्रमुख सौ. कांचन नाईक उपस्थित होत्या. स्वागतगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. समूहाच्या गटप्रमुख सौ. कांचन नाईक यांनी प्रास्ताविक केले. सौ. गंधाली नागेशकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सौ. रेखा नाईक यांनी अहवाल सादर केला. सौ. सिद्धी निगळ्ये, सौ. माधवी कपिलेश्वरकर आणि सौ. मनुजा नाईक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांची सूची घोषित केली. सौ. श्रीलेखा लिमये यांनी आभार मानले. यानंतर मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
सौ. ढवळीकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आपल्या भारतीय संस्कृतीत दीप विझवून नव्हे, तर दीप प्रज्वलित करून आणि औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. सध्या हिंदु युवकांमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’चे फॅड चालू झाले आहे. या सर्व प्रकारांना आपण संघटितपणे विरोध केला पाहिजे. मुले अनुकरणातून, निरीक्षणातून शिकत असतात, म्हणून मुलांसमोर चांगल्या गोष्टी ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांचे बालपण हरवत जाऊ नये, यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे आहे.’’
मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुले सरस ठरतात ! – मच्छींद्र च्यारी
मराठी ही भाषा समृद्ध भाषा असून या भाषेतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व समृद्धीकडे वाटचाल करत अधिक फुलते. प्राथमिक स्तरावर मराठी माध्यमातून शिकलेली मुले इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा अधिक सरस ठरतात, असे प्रतिपादन श्री. मच्छिंद्र च्यारी यांनी या वेळी केले.
श्री. मच्छिंद्र च्यारी पुढे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणासमवेत आपली संस्कृती आणि परंपरा यांविषयी
आदर निर्माण करणारे शिक्षण दिले पाहिजे. तरच आदर्श पिढ्या निर्माण होतील.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात