Menu Close

धर्मांतरासाठी विदेशातून कोट्यवधी रुपये येतात, ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही ! – श्री. सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

‘साम’ वाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

चर्चासत्रात सूत्र मांडतांना डावीकडून दुसरे श्री. सतीश कोचरेकर

मुंबई : भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या घटत आहे. लोकसंख्येची टक्केवारी पहाता दिवसेंदिवस हिंदूंची लोकसंख्या न्यून होत आहे. फाळणीच्या वेळी भारतात ९० टक्के हिंदू होते. आज भारतात ७६ टक्के हिंदू शिल्लक आहेत. पाकिस्तानात २२ टक्के हिंदू होते. आता तेथे केवळ १ टक्का हिंदू शिल्लक आहेत. हिंदूंचे धर्मांतर होत आहे. हिंदूंनी मात्र कधीही कुणाचे धर्मांतर केलेले नाही. हिंदुबहुल असलेला अरुणाचल प्रदेश आज ख्रिस्तीबहुल झालेला आहे. या देशात धर्मांतरासाठी कोट्यवधी रुपये बाहेरून येत आहेत हे उघड सत्य आहे. ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे जे सत्य आहे ते मांडायला कुणाची हरकत नसावी. सत्याला पाठिंबा देण्यात आम्हाला काही चूक वाटत नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. काँग्रेस कमिटीने ‘अरुणाचल प्रदेशाला हिंदु राज्य बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे विधान केले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री किरण रिजीजू यांनी ‘हिंदूंची लोकसंख्या अल्प होते आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘साम’ या वृत्तवाहिनीवर ‘हिंदूंची लोकशाही’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात श्री. सतीश कोचरेकर यांच्यासह काँग्रेसचे प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे, भाजपचे प्रवक्ता विश्‍वास पाठक, एम्आयएम्चे प्रवक्ता आर् एफ् हुसैनी, महिमा ख्रिस्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन कांबळे, मराठी ख्रिस्ती समुदायाच्या वतीने पास्टर विशाल मोरेश्‍वर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय आवटे यांनी केले.

६० वर्षांच्या सत्ताकाळात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांचे हास्यास्पद विधान !

(म्हणे) ‘सर्वांना समान अधिकार देणे आणि सर्वांना घेऊन वाटचाल करणे, हा लोकशाहीचा गाभा आहे !’ – डॉ. राजू वाघमारे, प्रवक्ता, काँग्रेस

सर्वांना समान अधिकार देणे आणि सर्वांना घेऊन वाटचाल करणे हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी केलेले ‘या देशात हिंदूंमुळे लोकशाही टिकून आहे’ हे विधान हास्यास्पद आहे. हिंदूंमध्ये जातीभेद आहेत. त्याचप्रमाणे वर्णव्यवस्था आहे. (अभ्यासहीन वक्यव्य करणारे राजू वाघमारे ! आजपर्यंत जात आणि आरक्षण यांच्या आधारे राजकारण करणार्‍या काँग्रेस पक्षाला याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्माच्या नावाने लोकांना गुंगवून ठेवणे, वास्तवतेपासून लोकांना दूर नेणे, विकासाकडे लक्ष केंद्रीत न करता त्यांचे लक्ष धर्माच्या नावावर केंद्रीत करणे, अशा प्रकारचा खेळ भाजपने सत्तेवर येण्यापूर्वीपासून चालू केला आहे. धर्म पालटणे ही वैयक्तीक गोष्ट असून सरकारने यात लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. वर्ष २००१ ते वर्ष २०११ या वर्षांतील लोकसंख्यावाढीचा दर पाहिला तर हिंदूंचा १.५ आणि मुसलमानांचा २.२ आहे. पुढील ५० वर्षांत याच दराने लोकसंख्या वाढत राहिली, तरी मुसलमानांची लोकसंख्या साडेएकोणतीस कोटी आणि हिंदूंची लोकसंख्या १८० कोटी होईल. लोकसंख्या वाढीचा हा दर कायम राहील्यास २०० वर्षांनंतर मुसलमान आणि हिंदू यांची लोकसंख्या समान होईल. त्या वेळी भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या पाचपट असेल. त्यामुळे ही आकडेवारी पहाता गृहमंत्र्यांनी केलेले विधान पोरकटपणाचे आहे. (हिंदूंचे धर्मांतर होत आहे ही वस्तूस्थिती असतांना अशी गणिते मांडून राजू वाघमारे स्वत:चेच हसे करून घेत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यांनी १९९९ पासून २०१६ पर्यंत रामाच्या नावावर राजकारण केले आणि आता धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. (काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी दुसर्‍यावर टीका करण्याऐवजी स्वत:चे आत्मपरीक्षण करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून केवळ विकासाचे राजकारण केले आहे ! – विश्‍वास पाठक, प्रवक्ता, भाजप

वर्ष २००१ ते वर्ष २०११ या वर्षांमध्ये अरुणाचल प्रदेशातील ख्रिश्‍चनांची संख्या १८ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर आली आहे, तर हिंदूंची लोकसंख्या ३८ टक्क्यांवरून २९ टक्क्यांवर आली आहे. ही वस्तूस्थिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी मांडली. काँग्रेस कमिटीने मात्र अरुणाचल प्रदेशाचे भगवेकरण करण्यात येत असल्याचे निराधार वक्तव्य केले. ‘काँग्रेसची सत्ता असतांना अरुणाचल प्रदेशाचे होत असलेले ख्रिस्तीकरण आता होणार नाही’, अशी भीती वाटत असल्यामुळेच काँग्रेसने हा वाद छेडला आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून केवळ विकासाचे राजकारण केले आहे.

(म्हणे) ‘ख्रिस्ती धर्मांतर करतात, हा आरोप पूर्णत: चुकीचा !’- बबन कांबळे, अध्यक्ष, महिमा ख्रिस्ती प्रतिष्ठान

ख्रिस्ती आमीष दाखवतात आणि धर्मांतर करतात, विदेशातून यासाठी कोट्यवधी रुपये येतात हे आरोप पूर्णत: चुकीचे आहेत. ख्रिस्ती धर्माचे काही पास्टर लोक सामाजिक कार्य करतात, तसेच प्रार्थनालये चालवतात. तेथे काही लोक केवळ प्रार्थना करण्यासाठी येतात. (चर्चमध्ये प्रार्थना करण्याच्या नावाखाली ‘येशू तुमच्या सर्व अडचणी सोडवेल’, असे सांगून, विविध प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यात येते. धर्मांतरासाठी विदेशातून पैसा येतो हेदेखील उघड सत्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) एखाद्या ठिकाणी बलपूर्वक धर्मांतर होत असेल, तर शासनाने त्याला आळा घालायला हवा. असे काही न करता हे विधान करणे चुकीचे आहे.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणारे संविधानाच्या विरोधात जात आहेत !’ – आर्. एफ्. हुसैनी, प्रवक्ता, एम्आयएम्

किरण रिजीजू यांनी केलेले विधान हे संविधानाच्या विरोधात आणि देशाला तोडणारे विधान आहे. ते हिंदु धर्माचे ठेकेदार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कलम १८ अंतर्गत सर्वांना आपापल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार दिला आहे. हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणारे संविधानाच्या विरोधात जात आहेत. (हिंदु राष्ट्राची मागणी ही संविधानाच्या चौकटीत बसणारी आहे. असे असूनही वारंवार हिंदु राष्ट्रावर टीका करणे हा हिंदुद्वेषच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘ख्रिस्ती समाज हा प्रेम आणि क्षमा यांचा धर्म !’ – पास्टर विशाल मोरेश्‍वर, मराठी ख्रिस्ती समुदाय

ख्रिस्ती समाज हा प्रेम आणि क्षमा यांचा धर्म आहे. ख्रिस्ती समाज नेहमीच भारत सरकार आणि संविधान यांच्या अधीन राहिलेला आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही अन्य समाजाशी तोलू नका. आमचा समाज राष्ट्रप्रेमी आहे. (अनेक चर्चमधून पाद्य्रांनी नन्सवर बलात्कार होत असल्याचे तसेच लहान मुलांवरही लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघड झाले आहे. प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणार्‍या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांकडून होणार्‍या या अपप्रकारांविषयी ख्रिस्त्यांना काय म्हणायचे आहे ? ख्रिस्तीबहुल झालेली ईशान्येकडील राज्ये भारतापासून वेगळी होण्याच्या सिद्धतेत आहेत. ही ख्रिस्त्यांची देशभक्ती आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

श्री. सतीश कोचरेकर यांनी चर्चासत्रात वस्तूस्थितीचे दाखले देऊन तथाकथित सर्वधर्मसमभावाचा बुरखा फाडला !

या वेळी चर्चासत्रात उपस्थित असणारे डॉ. राजू वाघमारे आणि आर्.एफ्. हुसैनी वारंवार सर्वधर्मसमभावाविषयी बोलत होते आणि हिंदूंमध्ये मूलतत्त्ववादी असल्याची टीका करत होते. याला सडेतोड उत्तर देतांना श्री. सतिश कोचरेकर म्हणाले, ‘‘किरण रिजीजू हे बौद्ध असल्याने त्यांनी ही प्रतिक्रिया केवळ राजकारणासाठी दिली हे विधान चुकीचे आहे. काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जेव्हा ‘या देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे’, असे विधान केले होते तेव्हा चर्चा करायला कुणी पुढे आले नव्हते. ‘हिंदूंचे धर्मांतर कशाप्रकारे होत आहे’, याविषयी काँग्रेसचे सरकार असतांनाच भारत सरकारच्या नियोगी कमिशनने अहवाला दिलेला आहे. पूर्वेकडील राज्यांत बोडो अतिरेकी, नक्षलवादी आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंना हाकलून देण्यात आले. कैरानासारख्या प्रदेशातून हिंदूंना विस्थापित व्हावे लागत आहे. हिंदूंच्या या दु:स्थितीवर बोलण्यास कुणीच पुढे येत नाही.’’

चर्चा भरकटवणारे आणि स्वत:चेच म्हणणे पुढे रेटणारे सूत्रसंचालक !

या वेळी सूत्रसंचालक संजय आवटे यांनी या देशात रहाणारे सर्वच नागरिक देशभक्त आहेत, असे विधान केले. यावर श्री. सतिश कोचरेकर यांनी भारतातून इसिसमध्ये भरती होणारे, याकूब मेमनच्या अंतयात्रेत सहभागी होणारे धर्मांध देशभक्त नसल्याचे सांगितले. तेव्हा सूत्रसंचालकांनी चर्चा भरकटवून ‘नथुराम गोडसे देशद्रोही होते का ?’ असा प्रश्‍न विचारला. यावर श्री. सतिश कोचरेकर यांनी, ‘‘संविधानाने ज्यांना देशद्रोही ठरवले ते देशद्रोही आहेत. नथुराम यांना संविधानाने देशद्रोही म्हटले नव्हते. ते देशभक्तच होते. आतंकवाद्यांना पाठिंबा देणार्‍यांना संविधानानेच देशद्रोही ठरवले आहे.’’ त्यानंतरही संजय आवटे स्वत:चेच म्हणणे पुढे रेटत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *