प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
३.५.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘श्रीयंत्राची निर्मिती मानवी नसून परग्रहवासीय असल्याचा एलीयनवादी संशोधकांचा दावा’ या मथळ्याखाली माहिती प्रसिद्ध झाली आहे. हे श्रीयंत्र १३ मैल लांबीचे असून १९९० मध्ये अमेरीकेतील ओरेगॉनच्या कोरड्या सरोवरात गूढ निर्माण झाले. विदेशातील लोकांना श्रीयंत्राविषयीचे गूढ आताच्या काळात लक्षात आले असले, तरी भारत देश हा मूलतःच श्रीचक्रांकित आहे, हे पुढे दिलेल्या विवेचनावरून दिसून येईल.
आपला भारत देश आरंभीपासूनच श्रीयंत्रांकित आहे. वरचा त्रिकोण हिमालय, अरवली आणि सातपुडा या पर्वतांनी बनला आहे. विंध्य पर्वत हा पाया असलेला आणि बाजूचे दोन पूर्वघाट आणि पश्चिम घाट मिळून खालचा त्रिकोण झाला आहे. सातपुडा आणि विंध्य पर्वत, हे समांतर रेषेत वसलेले असून त्यांच्यामधून नर्मदा नदी वाहते. या पर्वताच्या श्रीचक्रामुळेच भारतात आध्यात्मिक चैतन्य शक्ती विलसत आहे. याशिवाय भारतभर चैतन्ययुक्त तीर्थक्षेत्रे प्रस्थापित झाली असून त्यामुळेही चैतन्याचा प्रभाव पडतो. म्हणूनच साधू-संत, देव अवतारकार्य याच भूमीवर झाले आहेत आणि अजूनही संत निर्मिती होत असून दैवी शक्तीचा वास आहे. अवतार कार्य याच भूमीवर होत असते; म्हणूनच अशा या भारतभूमीत जन्म घेणे, हे भाग्याचे लक्षण समजले जाते; कारण येथे गुरुकृपेद्वारा साधना करून जीव आपले कल्याण करून ईश्वरप्राप्ती करून घेतो. त्यामुळे ते जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटतात.
– प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात