माहेर्शाला अली हा ऑस्कर जिंकणारा पहिला मुस्लिम अभिनेता असला, तरी पाकिस्तान त्याला मुस्लिम मानण्यास तयार नाही. कारण अली हा अहमदिया पंथातील असून हा पंथ काफिर असल्याचे पाकिस्तानातील मुस्लिमांचे मत आहे.
अली याला ‘मूनलाईट’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या संदर्भात राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी ट्वीट करून त्याचे पहिलेपण अधोरेखित केले होते. मात्र कट्टर सुन्नी लोकांच्या रोषाची जाणीव झाल्यावर थोड्याच वेळात त्यांनी ते ट्वीट काढून टाकले.
अली हा मूळचा ख्रिस्ती असून त्याने धर्मांतर केले आहे. त्याची पत्नी अहमदिया पंथाची असून तिनेच अलीला अहमदिया पंथात प्रवेश करण्यास प्रवृत्त केले. मात्र पाकिस्तानमधील कट्टरपंथियांच्या दबावामुळे १९७४ सालीच कायद्यात दुरुस्ती करून अहमदिया यांना अमुस्लिम घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये त्यांना स्वतःला मुस्लिम म्हणवून घेण्यास व त्यांच्या प्रार्थनास्थळाला मशीद म्हणण्यासही बंदी आहे. पाकिस्तानात पासपोर्टसाठी अर्ज करतानाही अहमदी मुस्लिम हे अमुस्लिम असल्याच्या निवेदनावर स्वाक्षरी करावी लागते.
संदर्भ : माझा पेपर