मुंबई : केरळ राज्यात साम्यवाद्यांच्या आतंकवादाचे प्रमाण वाढत असून हिंदुत्वनिष्ठ आणि संघ कार्यकर्ते यांच्या हत्याही होत आहे. याच्या विरोधात १ मार्च या दिवशी महाराष्ट्रातील हिंदू एकवटले. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, सभा घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
बेळगाव येथे मोर्चा
येथे नागरिक हितरक्षक समिती बेळगावद्वारे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. मोर्च्यात ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. मोर्च्यात आमदार सर्वश्री संजय पाटील, भाजप उत्तर विभागाचे किरण जाधव, भाजपचे बेळगाव जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे खासदार सर्वश्री सुरेश अंगडी, बजरंग दलाचे स्वरूप कालकुंद्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह श्री. अरविंद देशपांडे आणि राष्ट्रसेविका समितीच्या सौ. माधुरी कुलकर्णी यांसह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
केरळ येथील कम्युनिस्ट पक्षाचे शासन आणि तेथील प्रशासन यांना तात्काळ आदेश देऊन हत्या करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, तसेच राजकीय द्वेषातून होत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना काढावी, या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुरेश इटनाळ यांना देण्यात आले.
आझाद मैदान (मुंबई) येथे निदर्शने
केरळमधील आतंकवाद राज्यपुरस्कृत – अतुल भातखळकर, आमदार, भाजप
मुंबई : पश्चिम बंगालप्रमाणेच केरळमध्येही साम्यवादांच्या आतंकवादाला केरळच्या राज्य सरकारचे समर्थन आहे. त्यामुळे ही राज्यसरकार पुरस्कृत आक्रमणे आहेत, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. येथे ‘फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेररिझम’च्या वतीने निदर्शने करण्यात आली.
या वेळी ‘आतापर्यंत केरळच्या हिंसाचारात २५० जणांची हत्या आणि ६०० कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत’, अशी माहिती फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेररिझम मंचाचे सदस्य आणि मान्यवर लेखक रतन शारदा यांनी दिली.
या वेळी भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी, फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेररिझम मंचाचे सदस्य आणि मान्यवर लेखक रतन शारदा, केरळचे सहसंघचालक के. के. बलराम आदी मान्यवरांसह ४०० ते ५०० जण उपस्थित होते. ठाणे येथेही मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली येथे आक्रोश सभा
केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ! – विकास सूर्यवंशी, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख
केरळ राज्यात मे २०१६ मध्ये मार्क्सवादी सरकार आल्यापासून संघ स्वयंसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांच्यावर आक्रमणे आणि त्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या इशार्यातवरूनच ही आक्रमणे होत आहेत. त्यामुळे केरळ राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि हिंदुत्वनिष्ठ नेेते श्री. विकास सूर्यवंशी यांनी केले. ते लोकशाही बचाव समितीच्या वतीने स्टेशन चौक येथे आयोजित आक्रोश सभेत बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ, सौ. नीता केळकर, समितीचे निमंत्रक श्री. बाळासाहेब गायकवाड, सर्वश्री गणेश गाडगीळ, जयंत रानडे, प्रकाश बिरजे यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्राह्मण सभा, भाजप, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, ग्राहक पंचायत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय रेठरेकर, संतोष देसाई यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेनंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
पुणे येथे धिक्कार सभा
एका हिंदुत्वनिष्ठाच्या हत्येतून सहस्रो कार्यकर्ते निर्माण होतील ! – हिंदूंची साम्यवाद्यांना चेतावणी
येथे प्रबोधन मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी ‘धिक्कार सभे’चे आयोजन करण्यात आलेे. साम्यवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून हिंदूंच्या हत्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. ‘केरळ राज्यात गेली ५ दशके हिंदूंच्या वेचून वेचून हत्या करण्यात येत आहेत. केरळचे सध्याचे मुख्यमंत्रीही एका संघ स्वयंसेवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. हिंदूंच्या हत्या होऊ देणारे केरळ सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी’, अशी मागणी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी केली.
या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे योगेश गोगावले, छावा संघटनेचे धनंजय जाधव, मजदूर संघाचे उदय पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो हिंदू उपस्थित होते. ‘साम्यवादी विचार विश्वभरातून नष्ट होत असून साम्यवादी ज्याला विरोध करतात, ती राष्ट्रवादी विचारधारा कधीच नष्ट होणार नाही. एका हिंदूच्या हत्येतून सहस्रो कार्यकर्ते निर्माण होतील’, असे गिरीश बापट यांनी सांगितले. मूळचे केरळचे असणारे श्री. रमेश यांनीही केरळमध्ये हिंदूंना येणारे अनुभव सांगितले.
जळगाव येथे धरणे आंदोलन
येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. या वेळी महापौर नितीन लढ्ढा, आमदार सौ. स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, गणेश महामंडळाचे सचिन नारळे, हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, सामाजिक समरसता मंचांचे प्रांत प्रमुख रमेश महाजन, बारा बलुतेदार संघटनेचे मुकुंद मेटकर यांसह स्वराज्य निर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल इत्यादी संघटनांचे १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात