जामनगर (गुजरात) : गुजरातमध्ये आतंकवादविरोधी पथकाने भावनगर येथून इसिसच्या दोन आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे आतंकवादी भाऊ असून त्यांनी सुरेंद्रनगर येथील मंदिरावर आक्रमण करण्याचा कट रचला होता. या आतंकवाद्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांचा खटला लढवण्याचा प्रयत्न अधिवक्त्याने केला, तर त्याला त्याच्या परिवारासह ठार करण्यात येईल आणि त्याचे घर जाळण्यात येईल, अशी चेतावणी हिंदू सेना नावाच्या संघटनेकडून देण्यात आली आहे.
या संघटनेचे अध्यक्ष प्रतीक भट्ट यांनी म्हटले आहे की, सर्व अधिवक्त्यांनी त्यांचा खटला लढवण्यास नकार दिला आहे; मात्र जामनगरच्या इम्तियाज कोरेजा या अधिवक्त्याने खटला लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (आतंकवाद्यांचा विरोध करण्यासाठी नव्हे, तर त्यांना साहाय्य करण्यासाठी पुढे असणारे त्यांचे धर्मबंधू ! अशांना देशभक्त म्हणायचे का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘जर कोरेजा हा खटला लढवतील, तर पुढे होणार्या परिणामांना तेच उत्तरदायी असतील’, अशी चेतावणी दिली आहे. भट्ट यांनी कोरेजा यांचे घर जाळण्याचीही चेतावणी दिली आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकही काढले आहे. या संदर्भात जामनगर पोलिसांनी प्रतीक भट्ट यांना कह्यात घेतले आणि नंतर त्यांना सोडून दिले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रतीक भट्ट हेही एक अधिवक्ता आहेत. ते बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या संपर्कातील आहेत.
या संदर्भात राजकोट बार असोसिएशनने ‘अटक करण्यात आलेले इसिसचे आतंकवादी वसीम आणि नईम रामोदिया यांचा खटला कोणताही अधिवक्ता लढवणार नाही’, असा प्रस्ताव संमत केला आहे. याच प्रकारचा प्रस्ताव जामनगर बार असोसिएशननेही घेतला आहे. (आतंकवाद्यांच्या विरोधात अशा प्रकारचा राष्ट्रप्रेमी प्रस्ताव संमत करणारे राजकोट आणि जामनगर येथील बार असोसिएशनचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात