नोम पेन्ह : सातव्या शतकातील एका हिंदू देवतेच्या मूर्तीचे फ्रान्समध्ये असलेले शीर तब्बल १३० वर्षांनंतर त्या देशाने पुन्हा कंबोडियाकडे सोपविले आहे. हे शीर मूळ शरीराला पुन्हा जोडण्यात आले असून, संग्रहालयात ठेवलेली ही मूर्ती आजपासून पुन्हा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.
भगवान हरिहराची ही मूर्ती आहे. १८८२ अथवा १८८३ मध्ये तेव्हाच्या फ्रेंच संशोधकांनी येथील मंदिरातील या मूर्तीचे शीर फ्रान्सला नेले होते. फ्रान्समधील एका संग्रहालात ते शीर नंतर ठेवण्यात आले होते. कंबोडियाने गेल्या काही वर्षांपासून विविध आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आधार घेत आपल्या देशातील मूर्तींचे आणि इतर कलाकृतींचे अवशेष पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यानुसार त्यांना नॉर्वेमधून नवव्या शतकातील शंकराची मूर्ती आणि १२ व्या शतकातील एक मूर्ती परत मिळाली होती. याशिवायही अनेक हिंदू देवतांच्या मूर्ती त्यांनी मिळविल्या आहेत. त्यामुळे, फ्रान्सने हे शीर परत देण्याच्या निर्णयाचे कंबोडियाने स्वागत केले असून, त्यांचे आभार मानले आहेत.
प्राचीन काळी कंबोडियात अनेक शतके हिंदू शासक होते. बौद्ध धर्माचा प्रसार होण्यापूर्वी हिंदू हाच येथील प्रमुख धर्म होता. सध्या येथील ९० टक्क्यांहून अधिक जनता बौद्ध आहे.
संदर्भ : सकाळ