सातारा : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे केलेले समाजसुधारणेचे कार्य हे अविस्मरणीय आहे. हिंदु समाजातील अनेक रुढी, प्रथा, परंपरा यांविरुद्ध लढा दिला आणि समाजातील अनिष्ट रुढींचे उच्चाटन करण्याचे महान कार्य केले. भाषाशुद्धी, लिपीशुद्धी वगैरे करून मराठी भाषेला समृद्ध केले. पाकिस्तानासह भारतापासून वेगळे झालेले देश पुन्हा भारतात घेऊन अखंड हिंदुस्थान उभा करणे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ध्येय होते. ते साकार करण्याचे कार्य पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी यांनी केले. अखिल भारत हिंदु महासभा आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील मोती चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
या वेळी हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री अधिवक्ता दत्ता सणस, शंकरराव नारकर, मुकुंद उरणे, धनराज जगताप, दयानंद दिघे, दीपक भुजबळ, भाऊराव स्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे, ज्येष्ठ लेखक आणि राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस श्री. जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात