मुंबई : सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे, असे गौरवोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी काढले. पतंजली योग समिती मुंबई यांच्या वतीने योगऋषी रामदेव बाबा यांचे योग चिकित्सा आणि ध्यान निःशुल्क शिबीर वांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स एम्एम्आर्डीए मैदान येथे १७ ते २१ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आले होते. शिबीर समाप्तीनंतर हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. वैद्य धुरी यांनी योगऋषी रामदेवबाबा यांना दैनिक सनातन प्रभात आणि सनातनचे प्रकाशन गोसंवर्धन ग्रंथ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शिबिराचा सलग ५ दिवस सहस्रो महिला, पुरुष आणि विद्यार्थी यांनी लाभ घेतला. या शिबिरात सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
देशासाठी तळमळीने कार्य करणारी सनातन संस्था ! – जयदीप आर्य
पतंजली योगपीठ हरीद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी श्री. जयदीप आर्य यांनी समितीचे कार्य जाणून घेतले. देशासाठी तळमळीने कार्य करणारी तुमची संस्था आहे. ईश्वर हे कार्य वृद्धींगत होण्यासाठी आपणास शक्ती देवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. पतंजली योग समितीच्या मुंबई राज्य प्रभारी मेधा चिपकर, मुंबई सोशल मिडियाचे प्रमुख श्री. अश्विन पुजारी, श्री. रमण तिवारी यांनी या प्रसंगी सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात