न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली घटना ताजी असतानाच भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. ४३ वर्षीय हरनिश पटेल यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हरनिश पटेल दक्षिण कॅरोलिनाच्या लँकस्टर शहरात राहत होते. गुरुवारी रात्री ही घटना घडली. हरनिश पटेल रात्री ११ वाजता दुकान बंद करुन घराकडे निघाले होते. त्यानंतर १० मिनिटातच त्यांच्या घरापासून काही अंतरावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.
गुरुवारी रात्री एका महिलेने पोलिसांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. महिलेने आपण ओरडण्याचा आणि गोळ्यांचा आवाज ऐकल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हरनिश मृतावस्थेत आढळले. पोलिसांना अद्याप आरोपींचा शोध लागला नसून तपास करत आहेत.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हरनिश यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
दरम्यान, श्रीनिवास कुचीबोटला याची वर्णविद्वेषातून हत्या करण्यात आल्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना निषेध केला. नवीन स्थलांतर नियम हे केवळ देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत असे ते म्हणाले. आम्ही अशा हीन स्वरूपाच्या कृत्यांचा निषेध करतो असे सांगत त्यांनी ज्यू केंद्रांना दिल्या जाणाऱ्या धमक्या व कन्सास गोळीबार घटनेचा उल्लेख केला. जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे संयुक्त अधिवेशनात हे पहिलेच भाषण होते.
संदर्भ : लोकमत