कंधार शहरालगत असलेल्या मानसपुरी गावाच्या शिवारात शेतीची मशागत करत असताना पुरातन मंदिर जमिनीखाली बुजवलेल्या अवस्थेत आढळले. त्याचे उत्खनन केले असता गर्भगृहासहित महादेवाची भव्य पिंड असलेले शिव मंदिर दिसून आले. मंदिरास पाहण्यासाठी व दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मानसपुरीत या पूर्वीही काही ऐतिहासिक मूर्ती आढळल्या आहेत.
कंधारच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून जवळच असलेल्या मानसपुरी येथील भगवान मानसपुरे यांच्या शेतात जेसीबीद्वारे शेतीचे सपाटीकरण करणे चालू होते. शेताच्या एका कोपऱ्यात मातीचा ढिगारा होता, त्यामुळे बरीचशी जमीन व्यापली गेली होती. त्या ढिगाऱ्यास समांतर करण्याच्या दृष्टीने साफसफाई करताना मोठमोठय़ा दगडी शिळा लागल्या. या शिळा घडवलेल्या असल्याचे लक्षात येताच भगवान मानसपुरे यानी सावकाश त्या बाजूस सरकवल्या असता त्यांना भुयार किंवा मोठा हौद असल्याचा अंदाज आल्यानंतर वरील सर्व माती बाजूला केल्यावर मंदिर असल्याचे लक्षात आले. काळजीपूर्वक त्यातील माती काढल्यावर त्या ठिकाणी सुंदर, सुबक घडीव अशी पिंड दिसली. या पिंडीची उंची ३ फूट व लांबी रुंदी ४ बाय ४ असून हा शिवलिंग चौकोनी आकाराचे आहे, गर्भगृह ८ बाय ८ असून गर्भगृहाची उंची ८ फूट आहे. याचा दरवाजा (प्रवेशद्वार) कोरीव नक्षीकाम केलेला आहे. या मंदिरास रंगकाम केल्याचे आढळून आले आहे. याच्या आतून व बाहेरून गेरू (लालसर रंग) लावण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे, मंदिर जमिनीच्या खाली पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत होते.
या मंदिर परिसरात बागेतील आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीचे मंदिर आहे. तसेच याच मंदिराच्या बाजूस १९८४ साली क्षेत्रपालाची १०० फूट उंचीची भव्य मूर्ती सापडलेली होती. याच भागात पुरातन मोठे तळे होते, असे सांगितले जाते; पण आज या ठिकाणी मोठे सपाट मैदान असल्याचे दिसते. एकतर हे तळे नष्ट झाले त्या वेळी हे मंदिर जमिनीखाली गाडले गेले असेल किंवा आक्रमणाच्या भितीने यास जमिनीखाली गाडले गेले असावे, असे दिसते. या मंदिराच्या रचनेवरून हे मंदिर इ.स. नवव्या शतकतील असावे, असा अंदाज आहे.
संदर्भ : लोकसत्ता