ठाणे : मुंबई येथे गोमांस घेऊन जाणारा ट्रक भाजप वासिंद विभाग अध्यक्ष सुनिल सोगळे व बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी पकडला आहे. रविवारी पहाटे २ च्या सुमारास वासिंद जवळील वेहळोली गावात ट्रक ताब्यात घेण्यात आला. या ट्रकमध्ये अडीच टन किलो वजनाचे गोमांस आढळून आले आहे. वासिंद पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेउन ट्रक चालकाला अटक केली आहे.
इकबाल मोहम्मद फकीर खान (नाशिक) व राणा सुलतान शेख (ठाणे) असे अटक केलेल्या ट्रक चालक व वाहकाचे नाव आहे. हा गोमांस भरलेला ट्रक मुंबई येथे घेऊन जात होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते यतिंद्र जैन यांना मुंबईत गोमांस वाहतूक केली जाणार आहे. असे समजताच त्यांनी तशी तक्रार सि.आर.पोलिसांकडे केली. त्यानुसार जैन, बजरंग दलाचे कार्यकर्ते व सुनिल सोगळे यांनी रात्रभर पाळत ठेवली होती.
रविवारी पहाटे च्या सुमारास सि. आर. पोलिस नाईक, रंजित पालवे, पोलिस शिपाई तुषार येवले यांनी पाठलाग करून वासिंद जवळील खातिवली येथे ट्रकला पकडले. संबंधीत एम.एच.१५ डी.के.४२५५ या क्रमांकाची आयशर कंपनीची गाडी तपासली असता त्यामध्ये जनावरांचे मांस असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
तात्काळ पोलिसांनी चालक व वाहकाला ताब्यात घेऊन वासिंद पोलिस स्थानकात प्राणी संरक्षण कायदा ५,६,९,११ प्राण्यांची क्रुरतेने हत्या व प्रतिबंधक कायदा कलम ११ (१)(१क) आणि कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दिप्ती मीठारी, सुनिल मोरे, दिपक जाधव करीत आहे.
दरम्यान शहापुर तालुक्यातून सातत्याने गोमांसाची चोरट्या पद्धतीने वाहतूक सुरू असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस होत चाललेली ही जनावरांची हत्या थांबविण्यासाठी बजरंग दलाने व नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे. आतातरी पोलिसांनी गोहत्येकडे गांर्भियाने लक्ष दयावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संदर्भ : र्इनाडू