Menu Close

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील ऐतिहासिक मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग

अल्पवयीन हिंदु मुलीवरील बलात्कार प्रकरण

१५ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्यास आक्रमक जनआंदोलन करण्याची चेतावणी

t_thu01photo
मोर्च्यात सहभागी हिंदू

नंदुरबार : नवापूर शहरातील दोन धर्मांधांनी शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात १५ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र (चार्जशीट) दाखल न झाल्यास याहून आक्रमक जनआंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी देण्यात आली. एवढा विराट मोर्चा निघूनही कोणतीही अनुचित घटना शहरात घडली नाही. या मोर्च्यात हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग होता.

१. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १५ आणि १७ वर्षीय २ धर्मांधांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी धुळे येथील बालसुधारगृहात १४ दिवसांसाठी करण्यात आली.

२. याला विरोेध म्हणून १७ जानेवारीच्या रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला, तर १८ जानेवारीला शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी बंद पाळला अन् दोन सहस्र विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही मोर्चा काढला गेला.

३. १९ जानेवारीच्या विराट मोर्च्यामुळे संपूर्ण रस्ता माणसांनी भरून गेल्याचेच चित्र होते. या विशाल जनसमुदायाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये उपस्थित होते. पोलिसांची अधिक कुमकही मागवण्यात आली होती. रस्त्यांवर ठिकठिकाणी छावण्या बनवण्यात आल्या होत्या. या वेळी नवापूर शहर, खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा यांसह पूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळून संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.

पंधरा दिवसाच्या आत चौकशी संपवून चार्जशीट दाखल न केल्यास प्रशासन सक्षम नसल्याचे मानले जाईल आणि पुढील आक्रमक आंदोलनाच्या परिणामांना प्रशासनच उत्तरदायी असेल, असे हिंदु रक्षा समितीने लेखी निवेदनात म्हटले आहे. नवापूर शहरात निर्भयापथक अस्तित्वात आणून सक्रीय करावे, अशीही मागणी निवेदनात केली आहे. हिंदु रक्षा समितीचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनाही निवेदने दिली.

सभेत मांडलेले विचार

१. बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक राजेश सोनी म्हणाले, अल्पवयीन मुलीचे म्हणणे आणि विराट जनसमुदायाचा जनक्षोभ यांना लक्षात घेऊन कडक कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा हे गुन्हेगार पळवाटांचा आधार घेऊन न्यायालयातून सुटतील; मात्र हा जनसमुदाय त्यांना देवमोगराच्या पावनभूमीत पुन्हा पाय ठेवू देणार नाही.

२. पत्रकार शंकर दर्जी आणि शिवसेनेचे हसमुख पाटील यांनी सांगितले, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. अन्य कोणी आम्हाला संस्कृती शिकवण्याची आवश्यकता नाही.

३. भाजपाच्या शैलजा टिभे यांनी महिलांना स्वसंरक्षणार्थ साहसी बनण्याचा संदेश दिला.

४. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये म्हणाले, पोलीस प्रशासन संरक्षणासाठी बांधील असले, तरी नागरिकांनीही सजग रहावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *