राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात ‘रणरागिणी’ची पोलिसांत तक्रार !
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत रहाणारे राम गोपाल वर्मा यांनी आज जागतिक महिला दिनीच विकृत ट्वीट करून महिलांचा घोर अपमान केला आहे. सनी लिऑन पुरुषांना जितके सुख देते, तितके सुख सर्व महिलांनी पुरुषांना द्यावे, अशा अभद्र शुभेच्छा महिलांना जाहीरपणे देत त्यांची मानसिकता किती खालच्या थराची आहे, हेच दाखवले आहे. या वक्तव्यावर समस्त महिलांचा अवमान केल्याबद्दल हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिणीच्या विशाखा म्हांबरे यांनी गोव्यातील म्हापसा पोलीस स्थानकात राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या वेळी विविध संघटनांतील महिला उपस्थित होत्या. राम गोपाल वर्मा यांनी तात्काळ त्यांच्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल सर्व महिलांची जाहीर क्षमा मागावी अन्यथा रणरागिणी राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, अशी चेतावनीही रणरागिणीच्या राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी दिली आहे.
राम गोपाल वर्मा यांच्या विकृत दृष्टीला महिलांमध्ये केवळ सनी लिऑन दिसत आहेत; मात्र तीच महिला रणचंडीचे रूप धारण करू शकते, झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते, हे दाखवण्याची वेळ आली आहे. राम गोपाल वर्मा ही मानवजातीसाठी एक विकृतीच आहे. सर्व चित्रपटसृष्टीने राम गोपाल वर्मा यांच्यावर बहिष्कार घालावा, तसेच या विकृत निर्मात्याला धडा शिकवण्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन रणरागिणीच्या वतीने करण्यात येत आहे.