केंद्रातील भाजपच्या मंत्र्यांनी केरळमधील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांप्रकरणी मौन बाळगले असतांना राजासिंह ठाकूर यांनी विरोध करणे हिंदूंना आशादायी वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
भाग्यनगर (तेलंगण) – येत्या १९ मार्च या दिवशी निझाम कॉलेज मैदानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकपची) सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन् संबोधित करणार आहेत. सभा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, तो भाग गोशामहाल मतदारसंघात येतो आणि या मतदारसंघाचे आमदार भाजपचे श्री. राजासिंग ठाकूर आहेत. श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. ‘त्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची सिद्धता करून आहोत’, असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात श्री. ठाकूर यांनी सामाजिक संकेतस्थळावर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या होत असलेल्या हत्यांची चित्रफीत प्रसारित केली होती. विजयन् हे हिंदूविरोधी असल्याचा आरोप करून श्री. ठाकूर यांनी तेलंगण पोलिसांना पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, विजयन् यांना भाग्यनगरमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना सभेत बोलू देऊ नये. जर पोलिसांनी तसे केले नाही, तर होणार्या परिणामांसाठी राज्य सरकार आणि पोलीस उत्तरदायी ठरतील. या पत्राला पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने श्री. ठाकूर यांनी पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या कळवल्या. (आमदाराच्या पत्राला उत्तर न देणारे पोलीस सामान्य जनतेच्या तक्रारींचे काय करत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘माझा माकपच्या सभेला विरोध नाही; मात्र त्यात केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलू देण्यास त्यांचा विरोध आहे. अन्यथा ही सभा होऊ देणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.