कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती बनवण्यावर हरित लवादाने स्थगिती दिल्याचे प्रकरण
कोल्हापूर – हरित लवादाच्या निकालानुसार कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींपासून प्रदूषण होते हे आता स्पष्ट आहे. त्यामुळे शासनाने यापुढील काळात ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी, तसेच हज यात्रेसारख्या धार्मिक यात्रांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात व्यय करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते शाहू स्मारक येथे ९ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु धर्माभिमानी श्री. गोविंद देशपांडे (सर), सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे उपस्थित होते.
या वेळी झालेली काही प्रश्नोत्तरे…
१. मूर्तीकारांचे प्रबोधन करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ?
श्री. मनोज खाडये – येणार्या गणेशोत्सवाच्या दृष्टीने मूर्तीकारांना भेटणे, त्यांचे प्रबोधन करणे, समाजाचे प्रबोधन करणे, अशा गोष्टी आम्ही चालू केल्या आहेत.
२. शाडू माती मुळात अल्प उपलब्ध आहे आणि मूर्तीची किंमत अधिक आहे, तर तुम्ही काय करणार ?
श्री. मनोज खाडये – भारत देशात शाडू माती अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ती मूर्तीकारांना उपलब्ध करून देता येईल. एकीकडे शासन हज यात्रेसारख्या अनावश्यक गोष्टींवर जर कोट्यवधी रुपये व्यय करते, तर कोट्यवधी हिंदूंसाठी शासन शाडूच्या मूर्तीसाठी का निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही ? या गोष्टीचा शासन स्तरावर निश्चित गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.
३. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीविषयी तुमची भूमिका काय ?
श्री. मनोज खाडये – अध्यात्मशास्त्रानुसार मातीचीच मूर्ती असणे अपेक्षित आहे. त्याचसवमेत प्लास्टर ऑफ पॅरिसरची मूर्ती पाण्यात विरघळf नाही. त्यामुळे मूर्तीकारांना शाडूचीच मूर्ती बनवणे अपेक्षित आहे.
४. हा निर्णय सप्टेंबर मासात असलेला असतांना पत्रकार परिषद इतक्या उशिरा का घेत आहात ?
श्री. मनोज खाडये – लवादाचा निर्णय आल्यानंतर शासन स्तरावर काहीतरी प्रयत्न होतील, शासन त्यांचा निर्णय पालटेल असे वाटले होते. त्यामुळे लवादाचा निर्णय आल्यावर आम्ही काही काळ वाट पाहिली; मात्र शासनस्तरावर या संदर्भात काहीच हालचाल न झाल्याने शेवटी आम्हाला पत्रकार परिषद घेऊन कागदाच्या मूर्तींचे तोटे समाजासमोर आणणे आवश्यक वाटले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यासहीन अध्यादेश काढून प्रदूषणाला शासनमान्यता दिली ! – अभय वर्तक
पुणे – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कागदाच्या लगद्याच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ३ मे २०११ या दिवशी अध्यादेश काढला होता. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हरित लवादाकडे याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर ‘महाराष्ट्र शासनाने कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवावे’ असे राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले होते. अशाप्रकारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यासहीन अध्यादेश काढून प्रदूषणाला जणू शासनमान्यताच दिली, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ९ मार्च या दिवशी येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पर्यावरणाचे अभ्यासक श्री. विकास भिसे, राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे, ‘गार्गी सेवा फाऊंडेशन’चे श्री. विजय गावडे, धर्माभिमानी सौ. शुभांगी आफळे, हिंदु महासभेचे गजानन नेरकर, हिंदु जनजागृती समितीचे प्रवीण नाईक आणि चैतन्य तागडे हे उपस्थित होते.
श्री. वर्तक पुढे म्हणाले,
१. कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवावी, यासाठी सर्वप्रथम डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आग्रह केला. डॉ. दाभोलकर स्वतःला वैज्ञानिक जाणीव असलेले असे म्हणत असत. मग त्यांनी अभ्यास न करताच असे आवाहन कसे केले ? यामुळे धार्मिक हानी झालीच; पण ‘अविवेकी’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याने पाण्याचे प्रदूषणही झाले.
२. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एका घटनेच्या संदर्भात वर्ष २०१० मध्येच कागद हा प्रदूषणकारी असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे ते नदीत विसर्जित करू नये’ अशा मार्गदर्शक सूचना पारित केल्या होत्या. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याकडे दुर्लक्ष करत अभ्यास न करता अशा प्रकारचा अध्यादेश काढून प्रदूषणाला प्रोत्साहन दिले.
अभ्यासाअंतीच अध्यादेश निघावेत ! – चारुदत्त आफळे
अभ्यासहीन निर्णय घेतल्यामुळेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. यापुढे पूर्ण संशोधन केल्याशिवाय कोणताही अध्यादेश निघणार नाही, याची सरकारने दक्षता घ्यावी, तसेच धर्माच्या संदर्भात कोणतेही निर्णय घेताना धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि विज्ञानाचे अभ्यासक यांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा.
गुन्ह्यालाच प्रोत्साहन मिळणे दुर्दैवी ! – विकास भिसे
पर्यावरण अभ्यासक श्री. विकास भिसे मुंबईतील ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ (इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी) यांनी केलेल्या संशोधनाचा संदर्भ देत म्हणाले,
‘‘मुळात कागद बनवण्याच्या प्रक्रियेतच प्रदूषण होते. कागदावर प्रक्रिया करून पुन्हा त्याचा कागदच बनवला, तर प्रदूषणाला आळा बसू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षाही कागदाच्या लगद्यामुळे अधिक प्रमाणात प्रदूषण होते.
१ किलो कागदी लगदा १ सहस्र लिटर पाणी खराब करू शकतो. याचा अर्थ वस्तूमानाच्या शंभर पट प्रदूषण करण्याची क्षमता कागदी लगद्यामध्ये आहे. प्रदूषण करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे, हा खरे तर गुन्हा आहे; मात्र सरकार गुन्हा थांबवण्याऐवजी त्यालाच प्रोत्साहन देत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे.’’
शाडू मातीच्या गणेशमूर्तींसाठी प्रोत्साहन द्यावे – गजानन नेरकर
कथित पर्यावरणवाद्यांच्या दबावाला बळी पडून कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना आतापर्यंत प्रोत्साहन दिले गेले. सरकारने आता त्यांच्या चुकीवर उपाययोजना म्हणून शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन द्यावे.
श्री. विजय गावडे यांनी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने उपाययोजना आखावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर ‘केवळ हिंदूंच्या सणांमध्ये लुडबुड करणारे सरकार आणि पर्यावरणवादी अन्य धर्मियांच्या सणांमधून होणार्या प्रदूषणाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात’, अशी टीका ‘राष्ट्र्रसंस्कृती अभियाना’चे सुयोग तांबोळी यांनी केली.