चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांचा उद्दामपणा !
महिलांच्या अधिकारासाठी प्रसिद्धीलोलुप आंदोलने करणारी भूमाता ब्रिगेड आणि तिच्या नेत्या तृप्ती देसाई कुठे भूमिगत झाल्या आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ‘जागतिक महिला दिनी’ ‘सनी लिओन पुरुषांना जितके सुख देते, तितके सुख सर्व महिलांनी पुरुषांना द्यावे’, अशा अभद्र शुभेच्छा महिलांना विकृत टि्वट करून देऊन महिलांचा घोर अपमान केला आहे. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या विशाखा म्हांबरे यांनी गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्यात वर्मा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती . वर्मा यांनी ‘रणरागिणी’च्या विशाखा म्हांबरे यांच्या विरुद्ध पोलिसांत उलट-तक्रार करण्याची धमकी टि्वट करून दिली आहे.
Filing counter against OverActivist wid 212 followers which wud b her family n friends, for disrespecting 18 lakh followers of @SunnyLeone https://t.co/hWQH8XBMYs
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 8, 2017
राम गोपाल वर्मा त्यांच्या टि्वटमध्ये म्हणतात, ‘तक्रार करणार्याचे केवळ २१२ फॉलोअर्स (अनुयायी) आहेत, तर सनी लिओनचे १८ लक्ष फॉलोअर्स आहेत. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणे म्हणजे या १८ लक्ष अनुयायांचा अवमान करणे आहे. याविषयी केवळ ईश्वर आणि फेसबूकवरील फॉलोअर्सची संख्याच खरे-खोटे ठरवू शकतेे.’ (पांडव ५ होते, तर कौरव १०० होते; म्हणून कौरव योग्य होते, असे ठरले नाही, हे राम गोपाल वर्मा यांना माहिती नाही का ? केवळ फॉलोअर्स संख्येवरून योग्य-अयोग्य ठरवणारे राम गोपाल वर्मा यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘रणरागिणी’च्या तक्रारदार महिलेला धमकावण्याचा प्रकार, हा राम गोपाल वर्मा यांना पैसा आणि प्रसिद्धी यांचा चढलेला माज !
मुंबई : महिलादिनी महिलांच्या संदर्भात अभद्र ट्विट केल्यावर ‘रणरागिणी’च्या सौ. विशाखा म्हांबरे यांनी तक्रार दाखल केली, त्यावर पश्चाताप तर सोडाच; पण तक्रारदार महिलेला धमकावण्याच्या सुरात तिच्या विरोधातच पोलीस तक्रार करण्याविषयीचे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. लोकशाहीप्रधान भारतामध्ये तक्रारदार महिलेला धमकावण्याचा प्रकार म्हणजे वर्मा यांना पैसा आणि प्रसिद्धी यांमुळे चढलेला माज आहे. वर्मा यांनी आमच्या विरोधात तक्रार नोंद करावीच. ‘रणरागिणी’ त्यांचा माज उतरवल्याशिवाय रहाणार नाहीत, अशी चेतावणी रणरागिणीच्या महाराष्ट्र राज्यसंघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
९ मार्चला केलेल्या ट्विटमध्ये ‘(ट्विटरच्या) केवळ ‘२१२ फॉलोअर्स’ असलेल्या तक्रारदार विशाखा म्हांबरे, १८ लाख फॉलोअर्स असलेल्या सनी लिओनचा अपमान करत आहेत’, असे म्हणत वर्मा यांनी त्यांची (अ)नैतिकता पुन्हा दाखवून दिली आहे. ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून एखाद्या महिलेचे चारित्र्य ठरवले जाते काय ? तर मग गुगल सर्चमध्ये सनी लिओन सलग पाच वर्षे अव्वल क्रमांकावर आहे, याचा अर्थ ती भारतातील सर्वांत चारित्र्यवान महिला आहे, असे राम गोपाल यांचे म्हणणे आहे काय ? तसेच दहीहंडी उत्सवात सनी लिओनला नाचवण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सत्तेची धुंदी उतरल्याने कदाचित् त्यांना सनी लिओन चुकीची वाटू लागली आहे आणि महिलांचा तात्कालिक पुळका आला आहे, असेही कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी म्हटले आहे.
महिलांच्या सन्मानासाठी राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार ३’ चित्रपटावर बहिष्कार घाला !
समस्त महिलांचा अपमान करूनही धमकावणारी भाषा करणारे राम गोपाल वर्मा यांना धडा शिकवण्यासाठी येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार्या ‘सरकार ३’ या त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन रणरागिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
गोवा राज्य महिला आयोगाकडे वर्मा यांच्या विरोधात तक्रार
पणजी : या प्रकरणी गोवा महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन आम्ही राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार केल्याचे कु. प्रतीक्षा कोरगांवकर यांनी सांगितले. आयोगाने तक्रारीची दखल घेऊन वर्मा यांनी केलेल्या अभद्र ट्विटसंदर्भातील पुरावे १० मार्च या दिवशी सुपुर्द करण्याची सूचना केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात