देवस्थानांच्या इनामी जमिनींचा आग्रह हे डाव्यांचे धर्मविरोधी षड्यंत्र !
मुंबई – राजे-महाराजे यांच्या प्राचीन काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेसाठी मोठमोठी मंदिरे बांधून त्यांचा भार राजकोषावर येऊ नये; म्हणून त्यांना स्वतंत्र जमिनी इनाम म्हणून दिल्या. यातून शेतकर्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह होण्यासह मंदिरांचा खर्चही निघत होता. स्वातंत्र्यानंतर राजेशाही निकालात निघाल्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून राजसत्ता मिळालेल्या राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून देशच बुडीत काढला. यात मंदिरांचा कोणताही दोष नसतांना आता मंदिरांच्या भूमींवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न करणे, हे धर्माला अफूची गोळी मानणार्या डाव्यांचे षड्यंत्र आहे. यासाठी ते शेतकर्यांना पुढे करून स्वार्थ साधत आहेत. जर देवस्थानांची इनाम जमीन शेतकर्यांच्या नावे करण्यात आली, तर त्या देवस्थानांचा व्यय डाव्या पक्षांच्या निधीतून करायचा का ? चुकीची धोरणे राबवून शेतकर्यांना देशोधडीला लावणार्या आणि आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या जमिनी कह्यात घेऊन त्या शेतकर्यांना देण्याची मागणी करायला हवी. तसेच हिंदु देवस्थानाच्या भूमी बळकावण्याची मागणी करणारे डावे पक्ष अशीच मागणी चर्च आणि वक्फ बोर्ड यांच्या जमिनींविषयी का करण्यास धजावत नाही, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे…
१. देवस्थानच्या जमिनीवर शेतकर्यांचा हक्क हवा, यासाठी भारतीय किसान सभा आणि अन्य शेतकरी संघटना यांच्या वतीने नुकतीच राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्याला हिंदु जनजागृती समितीचा विरोध आहे.
२. आधीच हिंदूंची बहुतांश देवस्थाने या ना त्या माध्यमांतून शासनाच्या नियंत्रणात असून बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अपप्रकार होत असल्याच्या बातम्याही अधून-मधून प्रसिद्धीस येत असतात. मग ते मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर असो कि पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर वा तुळजापूरचे श्री भवानीमाता मंदिर ! देवस्थातील या भ्रष्टाचाराच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने समविचारी संघटनांसह लढा उभारला आहे. त्या अंतर्गत पंढरपूर येथील श्री विठ्ठल देवस्थानची १२०० एकर जमिनी ३०० एकर भूमी पुन्हा देवस्थानला मिळवून देण्यात समितीला यश आले आले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नियंत्रणाखाली असलेल्या ३ सहस्र ६७ मंदिरांच्या २४ सहस्र एकर जमिनीपैकी गायब असलेल्या ७ सहस्र एकर जमिनीचा शोध घेण्यासाठी समितीने अन्य संघटनांसह आंदोलन चालू केलेले आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाच्या वतीने चौकशी लावण्यास समितीला यश मिळवले आहे.
३. आज हिंदु धर्मावर चोहो बाजूंनी आघात होत आहेत. अशा वेळी हिंदूंना आध्यात्मिक बळ आणि ऊर्जा पुरवण्याचे काम मंदिरे करत आहेत; मात्र अशा आंदोलनांच्या माध्यमांतून मंदिरांना संपवण्याचे षड्यंत्र केले जात आहे. शेतकर्यांनी या षड्यंत्राला बळी पडू नये.
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’