बीजिंग : जागतिक इस्लामी दहशतवादाचा चीनमध्ये प्रभाव वाढण्याची भीती येथील नेतृत्वास असलेली भीती गेल्या काही वर्षांत अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
सीरिया व इराकमधील दहशतवाद्यांबरोबर चीनमधील मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायातील दहशतवादीही “लढत’ असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर या समस्येविरोधात आता “लोकयुद्धा’ची आवश्यकता असल्याचे चिनी नेतृत्वास वाटू लागले आहे. चीनचे नेतृत्व करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या शिनजियांगमधील शाखेतील उच्चस्तरीय राजकीय अधिकारी शरहात अहान यांनी जागतिक दहशतवादामुळे चीनमध्ये अस्थिरता निर्माण होत असल्याचा इशारा देत या आव्हानाविरोधात लोकयुद्ध केले जावे, असे म्हटले आहे.
शिनजियांग या चीनच्या अतिवायव्येकडील भागामध्ये उघर मुस्लिमांची लोकसंख्या आहे. शिनजियांगमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत गेल्या काही वर्षांत शेकडो ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, देशातील इस्लामी दहशतवादाचे संकट अधिक आव्हानात्मक होण्याचे भीती चिनी नेतृत्वास आहे. गेल्या महिन्यामध्येच इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने इराकमध्ये उघूर दहशतवादी “प्रशिक्षण’ घेत असल्याचे चित्रीकरण प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर, दहशतवादाचा धोका हा अपेक्षेपेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे मानले जात आहे.
शिनजियांगप्रमाणेच चीनमधील निंगक्षिया हुई या भागामध्येही मुस्लिम लोकसंख्या आहे. मात्र शिनजियांगच्या तुलनेमध्ये या भागामध्ये मुस्लिम फुटीरतावाद्यांचा धोका कमी आहे. मात्र या भागामधील अधिकाऱ्यांनीही दहशतवादाचा धोका गंभीर असल्याचा इशारा दिला आहे. चीनमधील धार्मिक व वांशिक अल्पसंख्यांकांचे “चिनीकरण’ केले जावे, असे मत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केले आहे. परंतु, हे आव्हान अत्यंत जटिल असल्याचे स्पष्ट आहे.
स्त्रोत : सकाळ