Menu Close

१५ वर्षे सलग खडकवासला जलाशय रक्षण अभियान यशस्वी

खडकवासला जलाशय रक्षण अभियान

  • हिंदूंनो, या यशासाठी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
  • खडकवासला जलाशय रक्षणासाठी संघटित होणार्‍या हिंदूंचे अभिनंदन !
खडकवासला जलाशयाच्या रक्षणार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेली मानवी साखळी

पुणे : समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले. गेली १४ वर्षे राबवण्यात येणार्‍या अभियानास जलदेवतेला भावपूर्ण प्रार्थना करून प्रारंभ झाला. सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत हिंदु जनजागृतीचे समितीचे कार्यकर्ते, कमिन्स इंडिया आस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच स्थानिक ग्रामस्थ खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी करून थांबले होते. या वेळी रंग खेळून धरणात उतरण्यास येणार्‍या युवकांचे प्रबोधन करण्यात आले, तसेच त्यांना होळी, रंगपंचमी, तसेच धूळवड या उत्सवाचे धर्मशास्त्र आणि उत्सव यांमागील उद्देश याविषयी अवगत करण्यात आले.

१. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी खडकवासला जलाशय रक्षणासाठी राबवल्या जाणार्‍या समितीच्या उपक्रमाची नोंद घेऊन नागरिकांना धरणात उतरण्यास प्रतिबंध केला.

२. ह.भ.प. विद्यानंद महाराज आणि ह.भ.प. विठ्ठलानंद महाराज यांच्या हस्ते नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

३. या प्रसंगी ‘योद्धा संन्यासी : विवेकानंद’ या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक श्री. दामोदर रामदासी, शिवसेनेच्या सौ. सुनीता खंडाळकर, पाटबंधारे विभागाचे श्री. धोंडीभाऊ भागवत, सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, गोर्‍हे बुद्रुकचे सरपंच श्री. सचिन पासलकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

४. स्थानिक ग्रामस्थांसह अनेक जणांनी या उपक्रमाला सहकार्य केले.

क्षणचित्रे

१. खडकवासला धरणरस्त्यावर पोलिसांच्या वतीने तपासणीनाका उभारण्यात आला होता. तेथे रंग खेळून आलेल्या व्यक्तींना पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात येत होता.

२. श्री. दामोदर रामदासी हे उद्घाटनसत्रानंतर अभियानातही सहभागी झाले होते.

३. जलसंपदा विभागाच्या वतीने अभियानाविषयी उद्घोषणेद्वारे जनजागृती करणारी रिक्शाही परिसरात फिरवण्यात येत होती.

४. नागरिकांनीही समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

५. आमदार रमेश वांजळे प्रतिष्ठान, श्रीराम बॉईज संघटना यांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे अभियानात सहभागी झाले होते.

६. ह.भ.प. अनंता महाराज देशमुख, भाजपचे श्री. राजाभाऊ भूमकर, गोर्‍हे बुद्रुकचे माजी उपसरपंच श्री. सुशांत खिरीड, भाजयुमोचे श्री. संतोष परदेशी यांनीही अभियानाच्या ठिकाणी भेट दिली.

७. तहसीलदार श्री. पिसाळ यांना ‘वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ हा सनातनने प्रकाशित केलेला ग्रंथ भेट देण्यात आला.

रंगायचेच आहे, तर कृष्णचिंतनात रंगा ! – ह.भ.प. विद्यानंद महाराज

पाणी हे जीवन आहे. पाण्याचे प्रदूषण करणे म्हणजे मनुष्याच्या जीवनाची हानी करण्यासारखे आहे. रासायनिक रंग प्रकृतीला हानीकारक असतात. हिंदूंचे सण-उत्सव यांमागील हेतू समजून घेऊन ते साजरे केले पाहिजेत. रंगायचेच असेल, तर रासायनिक रंगात रंगण्यापेक्षा नामस्मरण आणि कृष्णचिंतन यांत रंगूया. त्याने आपल्या मनुष्यजीवनाचे सार्थक होईल.

दुर्गुणांपासून समाजाचे रक्षण व्हावे ! – ह.भ.प. विठ्ठलानंद महाराज

आज सण-उत्सव यांमागील उद्देश लुप्त होऊन त्यांचे स्वरूप केवळ परंपरा आणि मौजमजा एवढेच उरले आहे. धर्माचे सामर्थ्य आपण विसरलो आहोत. त्यासाठी समिती राबवत असलेला उपक्रम स्तुत्य असून दुर्गुणांपासून समाजाचे रक्षण करण्याचे कार्य आता जोमाने करायला हवे.

सृष्टीचे रक्षण करायला हवे ! – श्री. दामोदर रामदासी

हिंदु धर्मात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी हे ऊर्जेचे वाहक आहे. आपण हिंदु सृष्टीचे पूजक असल्याने सृष्टीचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे.

श्री. भागवत यांनी समितीचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना व्यक्त केली. सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक यांनी हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी धर्मविरोधकांकडून केला जाणारा बुद्धीभेद हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आणि संघटित होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वश्री स्वप्नील धनवडे, संतोष देवकर, सागर मते, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू संप्रदायाचे श्री. अरुण बेलुसे, श्री. जयगुरु मते, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. बापू सांदणे यांचे सहकार्य लाभले.

हवेली तालुक्याच्या तहसीलदारांचे गौरवोद्गार हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद !

हवेली तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रशांत पिसाळ यांनी खडकवासला जलाशय रक्षण अभियानाच्या ठिकाणी भेट दिली. ‘समितीचे कार्यकर्ते केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर खरोखर तळमळीने कार्य करत आहेत. १४ वर्षांपासून समिती स्वयंस्फूर्तीने कार्य करत आहे, हे कौतुकास्पद आहे. केवळ कागदोपत्री नाही, तर प्रशासनाचे आणखी प्रत्यक्ष सहकार्य मिळेल’, असेही ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *