शनिशिंगणापूर येथे धर्मपरंपरा मोडू पहाणार्या नास्तिकवादी महिलांना शिवसेनेची चेतावणी !
हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीमध्ये शिवसेनेचा कृतीशील सहभाग !
* शिवसेनेची नगर येथे पत्रकार परिषद
* धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ चळवळीमध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेचे आभार !
नगर, २२ जानेवारी (वार्ता) – येत्या २६ जानेवारीला तथाकथित पुरो(अधो)गामी आणि नास्तिकवादी महिलांकडून श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांनी चढण्याची कृती ही पूर्णपणे चुकीची आहे. त्या महिलांची ही धर्मविरोधी कृती ही केवळ शनिशिंगणापूर येथे जाऊन स्टंटबाजी करणारी आहे. त्या नास्तिकवादी कृत्याला आम्ही पूर्ण विरोध करतो. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या नास्तिकवादी महिलांना शिवसेना तिच्या पद्धतीने उत्तर देईल.
२६ जानेवारी या दिवशी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला एकत्र येतील आणि त्या नास्तिकवादी महिलांचे षड्यंत्र हाणून पाडतील. त्या नास्तिकवादी महिलांच्या चुकीच्या कृतीमुळे आम्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी पोलीस आणि प्रशासनाने त्या महिलांवर शनिशिंगणापूर येथे आल्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना जिल्ह्यात येण्यापासून रोखावे आणि त्यांना नगर जिल्हा बंदी करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर यांनी केली.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी आमदार श्री. अनिलभैय्या राठोड, शिवसेनेचे माजी महापौर श्री. भगवानराव फुलसौंदर, शिवसेनेचे नगरसेवक श्री. अनिल शिंदे, शिवसेनेच्या नगरसेविका कांता बोठे, शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अरुणा गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. ही पत्रकार परिषद २२ जानेवारी या दिवशी येथील शिवसेना कार्यालयामध्ये पार पडली.
त्या पुढे म्हणाल्या की, स्त्रियांना हिंदु धर्माइतके महत्त्व अन्य कोणत्याही धर्मात नाही. एखाद्या धार्मिक परंपरेविषयी शास्त्र समजून न घेता जाणीवपूर्वक महिलांना डावलले जात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. तेथे सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेता येते. यामुळे तेथे केवळ स्त्रियांना प्रवेश नाही, असे म्हणणे अयोग्य आहे. असे असतांनाही काही तथाकथित पुरोगामी, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड नामक संघटना हे धर्मातील रूढी, परंपरा आणि श्रद्धा यांवर जाणीवपूर्वक आघात करत आहेत. यामुळे शनिभक्त आणि लक्षावधी हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. धर्मपरंपरेचे रक्षण करत असतांना आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही त्या महिलांना शनिदेवाच्या चौथर्यावर चढू देणार नाही.
या पत्रकार परिषदेत पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे करण्यात आलेल्या विविध मागण्या
१. नास्तिकवादी महिलांना जिल्ह्यात येण्यापासून रोखावे.
२. भूमाता ब्रिगेड नामक संघटनेच्या महिलांना नगर जिल्हा बंदी करावी.
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’