नवी देहलीच्या जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन !
नवी देहली : ११ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका, महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका यांमध्ये वापरण्यात आलेल्या ई.व्ही.एम्. अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोटाळा झाल्याच्या घटना समोर आल्या. यामुळे ही मागणी या आंदोलनात करण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी ११ लाख मतदारांची नावे गायब होणे, मृत व्यक्तीच्या नावाने मतदान केले जाणे, प्रत्यक्ष मतदान आणि मतगणना यांत अंतर असणे, उमेदवाराने आणि त्याच्या कुटुंबाने मतदान करूनही उमेदवाराला शून्य मते मिळणे आदी घटना समोर आल्या. यामुळे मतदानावरील विश्वास अल्प झाला आहे. यावर तात्काळ उपाययोजना काढण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे मौलाना देहलवी यांच्यावर कठोर कारवाई करा !
‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील मुसलमान मतदारांविषयीच्या एका चर्चासत्रात तलाकच्या विषयावर बोलतांना मौलाना देहलवी यांनी प्रभु श्रीराम आणि माता सीता यांचा अवमान केला. ते म्हणाले की, ‘तलाक’ आमच्या धर्माचा अंतर्गत विषय आहे. ज्यांच्या रामाने सीतेला सोडले, ते आमच्या तलाकविषयी बोलत आहेत, असे संतापजनक वक्तव्य केले. तसेच साजिद रशीद यांनी ‘मोदी यांनी त्यांच्या पत्नीशी न्याय केला आहे का?’, असा प्रश्न करून त्यांचा अवमान केला. रशीद यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, तर देहलवी यांच्यावर कलम २९५ अ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.
या व्यतिरिक्त हिंदूंचे आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने धर्मांतर बंदी कायदा बनवावा, अशी मागणीही करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात