मंगळुरू (कर्नाटक) – देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन आणि संघटित होऊन भ्रष्टाचाराच्या मोठ्या समस्येला तोंड देण्यास सिद्ध व्हावेे लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि धर्माभिमानी श्री. अनंत कामत यांनी केले.
मंगळुरू तालुक्यातील एडपदवी येथील श्रीराम मंदिरात नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेला सनातन संस्थेच्या सौ. संगीता प्रभु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर, रणरागिणी शाखेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी संबोधित केले. या वेळी सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच पर्याय ! – श्री. चंद्र मोगेर, हिंदु जनजागृती समिती
मूडबिद्रे येथील गोरक्षक प्रशांत पुजारी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याविषयी एकही धर्मनिरपेक्षवादी चकार शब्द काढत नाहीत. पुजारी कुटुंबाला आर्थिक साहाय्यही दिले नाही. शृंगेरी येथे गो-तस्करांवर झालेल्या गोळीबारानंतर पोलीस अधिकार्यालाच निलंबित करण्यात आले आणि सरकारने त्वरीत मृताच्या कुटुंबाला १० लक्ष रूपये देण्याची घोषणा केली. आज हिंदूंना कोणीच वाली नाही आहे. त्यामुळे हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच पर्याय आहे.
हिंदुत्वनिष्ठांवरील अन्यायाच्या विरोधात संघटित होणे आवश्यक ! – सौ. संगीता प्रभु, प्रवक्ता, सनातन संस्था.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यासह कर्नल पुरोहीत, हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई, आदी हिंदुत्वनिष्ठ आजही कारागृहात असणे हे हिंदूंवरचे संकटच आहे. गोव्यात श्री. प्रमोद मुतालिक यांना, तर कर्नाटकात विश्व हिंदु परिषदेच्या प्रवीण तोगाडिया यांना प्रवेशबंदी करण्यात आली. उद्या हीच स्थिती सर्व हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांवर आणि संतांवर येऊ शकते. असे होऊ नये यासाठी आजच संघटीत होणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. सभेला दक्षिण कन्नड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. कृष्ण जे. पालेमार उपस्थित होते.
२. श्रीराम मंदिराचे अध्यक्ष श्री. मुरळीधर शेट्टी यांनी सर्व उपस्थित धर्माभिमान्यांना सनातनचे कुंकू वितरित करणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात