बेंगळुरू : बेंगळुरू येथील ‘मल्लेश्वरम् लेडीज असोसिएशन’ या व्यवस्थापन कौशल्याच्या महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘कन्या शौर्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषादेवी, रणरागिणीच्या वतीने कु. भव्या गौडा आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. मोहन गौडा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षक कु. रसिका दोड्डण्णावर यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास सुमारे ९० विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली.
या वेळी कु. भव्या गौडा यांनी स्वसरंक्षणाची आवश्यकता विशद केली. त्या म्हणल्या, ‘‘आता बेंगळुरूसारख्या शहरामध्ये रात्री नाही, तर अगदी दिवसाढवळ्यादेखील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे आपण स्वत: स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे. तसेच युवापिढीला कन्या शौर्य अभियानामध्ये सहभागी होऊन राष्ट्ररक्षणासाठी एकजूट होणे आवश्यक आहे’’.
श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘आजकाल आपल्या सर्वांचे मनोबल इतके खचले आहे की, आपण साधे झुरळ, पाल, उंदीर यांनाही घाबरतो. यासाठी आपण साधना करून, ईश्वराप्रतीच्या श्रद्धेच्या साहाय्याने क्षात्रवृत्ती वृद्धींगत केली पाहिजे आणि स्वामी विवेकानंदांप्रमाणे साधनेच्या बळाने राष्ट्ररक्षणाच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे.’’
यानंतर प्राचार्या उषादेवी यांनी प्रत्येक शनिवारी मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची विनंती केली आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. शेवटी स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. त्यातून स्फूर्ती घेऊन २ विद्यार्थिनींनी स्वत:हून या प्रात्याक्षिकांमध्ये सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात