हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे दौरा चालू आहे. ते येथे आध्यात्मिक कार्यक्रमात, तसेच शैक्षणिक संस्थेत आणि व्यावसायिक यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच येथील एफ्.एम्. रेडियोने त्यांची मुलाखतही घेतली. या वेळी त्यांनी हिंदु धर्म आणि साधना याविषयी मार्गदर्शन केले, तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
१. सर्वसमावेशी यज्ञोपवित कार्यक्रमात सहभाग संत हे धर्माचे सैनिक ! – श्री श्रीनिवास महाराज
शिवसेना नेपाळ आणि श्री शिव शक्ति राहुलेश्वरानंद फाऊंडेशन यांच्यावतीने समावेशी (सर्वजातीतील) यज्ञोपवित धारण करवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी परमहंस सदगुरु राहुलेश्वरानंद महाराजांनी सर्व बटूंना गायत्री मंत्राची दीक्षा दिली. या वेळी नेपाळचे युवा क्रांतीकारी संत श्री श्रीनिवास महाराज, पशुपती मृगस्थळीचे महंत योगी श्री श्रीषनाथ महाराज, शिवसेना नेपाळचे अध्यक्ष श्री. अनिल बस्नेत, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आदी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
श्री श्रीनिवास महाराज म्हणाले, ‘‘संत हे धर्माचे सैनिक आहेत. त्यांनी भगवी वस्त्रे पोटासाठी नाही, तर धर्मासाठी धारण केली आहेत, हे कोणी विसरू नये.’’
संस्कारासाठी (देखाव्यासाठी) संस्कार करणे हा एक प्रकारे अधर्मच ! – पू. डॉ. पिंगळे
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘सनातन धर्मात स्पृश्य-अस्पृश्यतेला शास्त्रीय आधार नाही. उपनयन संस्कारातील उपनयनचा अर्थ म्हणजे गायत्री मंत्र शिकण्यासाठी गुरुगृही पाठवणे. तसेच दुसर्या अर्थाने ‘उपनयन म्हणजे अंत:चक्षु. ज्या विधीमुळे म्हणजे साधनेने जिवाचे अंत:चक्षु उघडतात अथवा उघडण्यासाठी साहाय्यभूत होते त्यास उपनयन असे म्हणतात.’ कोणताही संस्कार का करतात, तो उद्देश जाणून जर जिवाने त्याचेे कर्म केले, तरच त्या संस्काराचा लाभ होऊन जीव-शिव ऐक्य साधले जाते अन्यथा संस्काराचा मुळ उद्देश न समजता संस्कारासाठी (देखाव्यासाठी) संस्कार करणे हा एक प्रकारे अधर्मच ठरतो, यात नवल काय ?’’, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.
२. त्रिभुवन विश्वविद्यालयात मार्गदर्शनाचे आयोजन
धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करत इतरांना धर्मशिक्षित करणे हे धर्मकर्तव्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
काठमांडू येथील त्रिभुवन विश्वविद्यालयात प्रा. डॉ. गोविंदशरण उपाध्याय यांनी आयोजित कार्यक्रमात पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदूंच्या सद्यस्थिती मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘जसे युद्धात शत्रू हा केंद्रबिंदू असतो, तसेच धर्मरक्षा करतांना सर्वप्रथम आपल्याला धर्माच्या शत्रूला ओळखणे आवश्यक आहे. सध्या ‘हिंदु धर्माच्या विरोधात जाणे, आपली धर्म-संस्कृती सोडून पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता’, असे झाले आहे. यासाठी स्वत: धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि इतरांना धर्मशिक्षित करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.’’ या वेळी त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
३. संतोष सहा फाऊंडेशनच्या कार्यक्रमात युवक-युवतींना मार्गदर्शन
सामर्थ्य सरोकार नेपाळच्या संतोष सहा फाऊंडेशनच्या ‘नेपाळ-इंडिया फ्युचर वेंचर डायलॉग सिरिज’च्या अंर्तगत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ‘एज्युकेशन इन धर्म अॅण्ड संस्कार : शेअरर्ड व्हॅल्यूस इन मॉर्डन डे नेपाळ-इंडिया रिलेशन्स’ या विषयावर मार्गदर्शन आणि शंकानिरसनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘शिक्षण म्हणजे काय ?’, ‘माहिती अन् ज्ञान म्हणजे काय?’, ‘धर्म म्हणजे काय?’, ‘संस्कार म्हणजे काय ?’, याविषयी त्यांनी सविस्तर सांगितले. पाश्चात्य शिक्षणाचे तोटे आणि त्यामुळे समाजावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांची चर्चा करण्यात आली. त्यासह शिक्षणात धर्म आणि संस्कार यांची अनिवार्यता काय आहे, हे समजावून सांगितले. प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच सर्वांना ते घेण्यास उद्युक्त केले पाहिजे, असे उपस्थितांना आवाहन करत पू. डॉ. पिंगळे यांनी विषय मांडला. या मार्गदर्शनाचा लाभ २१ युवक-युवतींनी घेतला. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करतांना पू. डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘आत्मानुभूतीसाठी प्रारंभ आपण जिथे आहोत तेथूनच करायला हवेत. यासाठी अध्यात्मातील माहिती असलेल्या एक-दोन सूत्रांना आचरणात आणले पाहिजे.’’ अन्य एका प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले की, जीवनात आनंदी होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आवश्यक आहे.
४. एफ्.एम्. रेडियोवरील मुलाखतीतल पू. डॉ. पिंगळे यांनी होळी सणाविषयी विविध आध्यात्मिक पैलू उलगडले !
कांतीपूर एफ्.एम्. रेडियोवर प्रा. जनार्दन घिमिरे यांनी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेतली. या वेळी होळीच्या शुुभेच्छा देतांना पू. डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘होळी हे लयाचा पर्व आहे. आसुरी संपदा म्हणजे दोष, षड्र्िपू, तसेच अज्ञान या अंतर्गत अशुद्धतेचा लय करून ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग या होळीतून निघतो. आतील आसुरी शक्तींवर म्हणजेच दोषांवर मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून बाह्य प्रतिकात्मक होळीचे दहन करून आपण आनंद साजरा करतो. व्यक्तीला धर्मशिक्षण मिळाले नाही, तर निश्चितच ती व्यक्ती अधर्माच्या मार्गावर जाते. आपला जन्म स्वधर्माला स्वस्वरूपाला जाणण्यासाठीच झालेला आहे. हिंंदूंनी केवळ जन्महिंदु न होता शास्त्र जाणून ज्ञानयुक्त कर्म केले पाहिजे आणि वेदांनी जे स्वस्वरुप जाणण्याचे अंतिम लक्ष्य सांगितले आहे ते प्राप्त केले पाहिजे. जीवन सार्थक करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आणि स्वतःच्या जीवनाच्या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रयत्न करावे.’’
५. ‘नया पत्रिका’ या दैनिकात पू. डॉ पिंगळे यांची मुलाखत प्रसिद्ध
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे नेपाळमध्ये असल्याचे समजल्यावर ‘नया पत्रिका’ या नेपाळी दैनिकाचे पत्रकार श्री. परशुराम काफले यांनी त्यांची मुलाखत घेतली. पू. डॉ. पिंगळे यांची छायाचित्रासह जवळपास अर्ध पान इतकी मुलाखत या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली.
या मुलाखतीत पू. डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘वैद्याने दिलेले प्रिसक्रिप्शन तोंडपाठ केल्याने आजार बरा होेत नाही, तर त्यासाठी वैद्याने सांगितल्याप्रमाणे औषधे घ्यावी लागतात. त्याच प्रमाणे शास्त्र समजून कर्म केल्याने लाभ होतो किंवा संत, गुरु यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने ईश्वरप्राप्ती शक्य असते.’’
६. नेपाळमधील धार्मिक वाहिनी ‘भक्तीदर्शन’वरील मुलाखतीत पू.डॉ. पिंगळे यांचे प्रतिपादन
व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक स्थिती उत्तम होण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता : नेपाळमधील एकमात्र धार्मिक वाहिनी ‘भक्तीदर्शन’वरील ‘भक्तीदर्शन क्लिनिक’ या कार्यक्रमात पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेण्यात आली. या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील एवढे शिक्षण घेऊनही अध्यात्माकडे वळण्याचे कारण सांगतांना त्यांनी वैद्यकीय विज्ञानाची मर्यादा आणि जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्तीच्या आरोग्याची व्याख्या सांगितली. या व्याख्येत, प्रारंभी शारीरिक स्वास्थ्य आणि नंतर शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य, त्यानंतर शारीरिक, मानसिक अन् सामाजिक स्वास्थ्य आणि शेवटी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ असणे, असे टप्याटप्याने व्याख्येत केलेले पालट सांगितले. तसेच आध्यात्मिक व्यक्ती मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने उत्तम असते. आज समाजाला धर्मशिक्षण नाही म्हणून समाज धर्मापासून परावृत्त झालेला आहे. यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनातील आणि समाजातील समस्या वाढल्या आहेत. धर्म प्रत्येकाला आपआपली कर्तव्ये पार पाडायला सांगतो. जर प्रत्येकाने त्याची कर्तव्ये पार पाडली नाही, तर कोणतीही व्यवस्था ढासळते. यासाठीच व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक स्थिती उत्तम होण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. कु. मनिता यांनी पू. डॉ. पिंगळे यांची मुलाखत घेतली.
पू. डॉ. पिंगळे यांनी सांगितलेला जप आणि न्यास केल्यानेच मी वाचू शकलो ! – डॉ. माधव भट्टराई
पू. डॉ. पिंगळे यांनी धर्मसभा नेपाळ आणि सनातन हिंदु मोर्चाचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई यांची सदिच्छा भेट घेतली. मागील काही दिवसांपासून डॉ. भट्टराई हे रुग्णाईत आहे आणि त्यांचे आरोग्य अत्यंत खालावले होते. या वेळी डॉ. भट्टराई म्हणाले, ‘‘मी ४-५ गुरूंकडून दीक्षा घेतली आहे आणि मी त्यांनी सांगितलेली उपासना करत होतो; पण केवळ तुम्ही सांगितलेला जप आणि न्यास केल्यानेच मी वाचू शकलो.’’ यावर पू. डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘या वयातही आपण धर्मरक्षण करण्यासाठी, तसेच नेपाळ हिंदु राष्ट्र होण्यासाठी कार्यरत असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले हेच तुमचे रक्षण करत आहेत.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात