काठमांडू : शहरातील पितृतीर्थ उत्तरगया (भारतातील गया येथे श्री विष्णूचे एक पाऊल आहे आणि येथे दुसरे पाऊल आहे) येथील गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी श्री. जगदीश करमरकर यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली. नेपाळ आणि भारत हे हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी हिंदूंनी संघटित करण्याचे असलेले समितीचे प्रामाणिक प्रयत्न पाहून श्री. करमरकर यांनी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची श्री कान्तिभैरव गुरुकुल विद्यालयाचे सचिव वेदमूर्ती श्री. श्रीराम अधिकारी यांच्याशी भेट घडवली.
श्री. श्रीराम अधिकारी हे केवळ अर्थार्जनासाठी पौरोहित्य करणारे पुरोहित न घडता धर्मरक्षण करणारे पुरोहित निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्नरत आहेत. या वेळी वेदाध्ययनाचे आणि श्रुती परंपरेची विशेषता सांगतांना श्री. अधिकारी म्हणाले, ‘‘वेदांच्या उच्चारणाला महत्त्व आहे आणि वेदाच्या एखाद्या शाखेचे स्वर कुठेही जाऊन शिकलो, तरी एकच असतात.’’
या वेळी पू. डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘वेदांनी समष्टीचा विचार केला आहे. जो स्वतःचा विचार करतो, त्याने वेद जाणले नाही, असे होते. आपण धर्म जाणला, धर्माची (ईश्वराची) अनुभूती घेतली; मात्र धर्मासाठी त्याग केला नाही, तर आपण धर्म जाणलाच नाही, असे होते.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात