मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
मुंबई : देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्रीफळावर बंदी घालणे म्हणजे हिंदूंना या धार्मिक लाभापासून वंचित करण्यासारखे आहे. आज अत्याधुनिक यंत्रांद्वारे नारळात दडवलेली स्फोटके शोधणे कठीण नाही. अशा यंत्रांचा वापर करून भाविकांची सुरक्षा आणि भाविकांना धार्मिक विधी करण्याची मुभा या दोन्ही गोष्टी साध्य करणे शक्य असूनही भाविकांच्या सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार शासनाला नाही, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी केले. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ घेऊन न जाण्याच्या सरकारच्या मागिल मासातील निर्णयाच्या विरोधात दादर पश्चिम येथील कबुतरखान्याजवळ १४ मार्चला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. भारतात त्वरित धर्मांतर विरोधी कायदा संमत करण्याची मागणीही राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. या वेळी श्री रायगड संवर्धन प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
श्री. राजेंद्र सावंत, श्री रायगड संवर्धन प्रतिष्ठान : आम्हा हिंदूंच्या मंदिरांवर घातलेले निर्बंध निंदनीय आहेत. शासनाकडून आमची धर्मश्रद्धा सर्रासपणे पायदळी तुडवली जात आहे. हिंदूंवर नेहमीच कायद्याचा बडगा उगारला जातो, अन्य धर्मियांना मात्र मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात हे आता खपवून घेतले जाणार नाही.
श्री. संघटन शर्मा, युवा नेता, बहुजन विकास आघाडी, मुंबई : हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर केला गेला पाहिजे, भाविकांच्या श्रद्धांचा विचार करून श्री सिद्धीविनायक मंदिरातील अंगारकीला असणारी नारळ बंदी त्वरित मागे घेण्यात यावी.
महाराष्ट्र सरकारच्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आंदोलनाच्या वेळी पुढे येऊन एका गणेशभक्त महिलेने व्यक्त केलेली संतप्त प्रतिक्रिया
‘अंगारकी चतुर्थीच्या वेळी आम्ही पाच नारळांचे तोरण घेऊन गेलो होतो. सुरक्षारक्षकांनी ते आम्हाला मंदिरात नेण्यास मज्जाव केला. तोरण आम्हाला बाहेर ठेवण्यास सांगितले. त्या वेळी आम्हाला खूप वाईट वाटले. नारळाच्या तोरणाऐवजी दानपेटीत पैसे टाका असे ते सांगत होते. हेही आम्हाला चुकीचे वाटले. – श्रीमती मनीषा कदम, खार पूर्व
क्षणचित्र : शिवसेनेचे नगर येथील शाखाप्रमुख श्री. मयूर चव्हाण आणि त्यांचे दोन मित्र आंदोलन पाहून आंदोलनात सहभागी झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात