- हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अवमान करणारे अभिनेते, निर्माते, आस्थापन यांचे चित्रपट आणि उत्पादने यांच्यावर हिंदूंनी बहिष्कारच घातला पाहिजे !
- हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अवमान करणार्यांच्या विरोधात कोणी तक्रार करण्यापूर्वीच सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे !
- सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानी आयते) या पुस्तकावर कोणी बंदीची मागणी करण्यापूर्वीच सरकारने बंदी घातली होती, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चेन्नई : चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ महाभारताविषयी अवमान करणारे विधान केल्याने तमिळनाडूतील हिंदू मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच अकिला हिंदू महासभेने कोइम्बतुर येथील जिल्हाधिकार्यांकडे तक्रार नोंदवली आहे. (तात्काळ तक्रार नोंदवणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
येथील तमिळ वृत्तवाहिनी ‘पुथियाथालामुरायी’चे संपादक कार्तीकगाईचेल्वान यांना मुलाखत देतांना कमल हसन म्हणाले, ‘‘पांडवांनी द्रौपदीला एका प्याद्याप्रमाणे द्यूतात लावले आणि ते हरले. असा महाभारत ग्रंथ भारतात वाचला जातो हे लाजिरवाणे आहे.’’ (स्वतः कमल हसन यांनी तरी महाभारत वाचले आहे का ? द्युत हरल्यानंतर श्रीकृष्णाने पांडवांना केलेले उपदेश हसन यांना ज्ञात आहे का ? हा ग्रंथ जर वाचला असता, तर हसन यांनी असे विधान केले नसते. महाभारत, गीता वाचून शेकडो हिंदूंचा उद्धार झाला ! अशा ग्रंथाविषयी आक्षेप घेणार्यांना देशात रहाण्याचा काय अधिकार ? अहिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये अनेक आक्षेपार्ह विधाने आहेत. त्याला विरोध करण्याचे धारिष्ट्य हसन दाखवतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदू मक्कल कत्छीचे राज्य सचिव श्री. राम रविकुमार म्हणाले, ‘‘कमल हसन याचे विधान हिंदूविरोधी आहेत. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच कमल हसन यांना हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांवर टीका करायचा काय अधिकार आहे ?
ते कुराण अथवा बायबल यांच्याविषयी असे बोलू शकतील का ? त्यांच्या ‘विश्वरूपम्’ या चित्रपटाला मुसलमानांनी आक्षेप घेतला होता, तेव्हा त्यांना ‘भारतात सुरक्षितता नाही’, याचा साक्षात्कार झाला होता आणि ते इतर देशात जाण्याची भाषा करत होते.’’ हिंदू मक्कल कत्छीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी ‘या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई करतो’, असे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात