‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता
जलसंवर्धन करण्याची कार्यकर्त्यांनी घेतली प्रतिज्ञा !
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला जलाशयाचे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण रोखले जावे; म्हणून राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या १५ व्या वर्षीही संपूर्ण यशस्वी झाले. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी जलदेवतेला प्रार्थना करून या अभियानाला प्रारंभ झाला. आजच्या अभियानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित कार्यकर्ते आणि मान्यवर यांनी जलप्रदूषण रोखण्याची अन् पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची प्रतिज्ञा केली.
१. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक यांसह ‘कमिन्स इंडिया लिमिटेड’चे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचा आजच्या अभियानात सक्रीय सहभाग होता.
२. प्रशासनाच्या वतीनेही धरणात उतरण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने रासायनिक रंग खेळून अंघोळीसाठी, तसेच पाणी खेळण्यासाठी येणार्या युवकांचे प्रमाण तुलनेने अल्प होते. या वर्षी पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनीही पत्रकार परिषद घेऊन रंग खेळून धरणाचे पाणी दूषित करण्याविषयी प्रतिबंध करण्यात आल्याचे घोषित केले.
३. भगवान श्रीकृष्णाचे प्रतिमा पूजन आणि जलदेवतेला प्रार्थना करून मोहिमेला आरंभ झाला. या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे श्री. धोंडीभाऊ भागवत आणि शाखाअभियंता राजकुमार क्षीरसागर यांनीही अभियानाला भेट दिली.
रंगपंचमीच्या दिवशी उपस्थित कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर यांनी जलरक्षणाची प्रतिज्ञा केली. ‘पाणी हे जीवन असून त्याचा वापर मी काटकसरीने आणि आवश्यकतेपुरता करीन. पाण्याचा अपव्यय आणि अपवापर करणार नाही. नैसर्गिक प्रवाह, जलाशये, कालवे आणि पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा यांचे मी रक्षण करीन. पाणीविषयक कायदे आणि नियम यांचे काटेकोरपणे पालन करीन. पाण्याचे संवर्धन आणि जतन करण्याचा मी प्रयत्न करीन’, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. पाटबंधारे विभागाच्या वतीने रिक्शावर कर्णे लावून धरणात न उतरण्याविषयी उदघोषणा करण्यात येत होती.
२. १२ ते १७ मार्च या कालावधीत आकाशवाणीवरून या अभियानाच्या संदर्भात प्रतिदिन ३ मिनिटांचे निवेदन प्रसारित केले जात होते.
कोंढवा येथील सिंहगड महाविद्यालयाचे अभियांत्रिकी शाखेचे काही विद्यार्थी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यांना जलरक्षण अभियानाविषयी अवगत केल्यानंतर विद्यार्थ्यांचा गट काही काळासाठी हातात प्रबोधनात्मक फलक धरून सहभागी झाला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात