राजे शिवराय प्रतिष्ठानचा शिवजयंती उत्सव
पुणे : मुसलमान आणि ख्रिस्ती प्रतिदिन वैयक्तिक, तसेच त्यांच्या धर्मासाठी प्रार्थना करतात; परंतु हिंदू कोणतीच उपासना करतांना दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेल्या यशामागे त्यांचे प्रयत्न आणि उपासनाही होती. हिंदूंनीही उपासनेद्वारे त्यांचे बळ वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केले. ११ मार्च या दिवशी कोथरूडमधील राजे शिवराय प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावर्षी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील ‘आग्य्राहून सुटका’ या ऐतिहासिक प्रसंगाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिष्ठानच्या यंदाच्या शिवजयंती उत्सवाची हीच मुख्य संकल्पना आहे.
या निमित्ताने ‘आग्य्राहून सुटका’ या सूत्रावर आधारित विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ शिवरायांच्या पोवाड्याने झाला. त्यानंतर ‘आग्य्राहून सुटका एक शिवसामर्थ्य’ हा माहितीपट दाखवण्यात आला.
ह.भ.प. चारूदत्त आफळे पुढे म्हणाले,
१. शिवचरित्र सांगतांना हिंदुत्व या शब्दाऐवजी ‘लोकांचा राजा’, ‘जनतेचा राजा’ अशी नावे दिली जातात; परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदूंचे रक्षणकर्ते अशीच शिवरायांची खरी ओळख आहे. आजची माध्यमे मात्र हिंदु असा कोणता धर्मच नाही, तो परकियांनी दिलेला शब्द आहे, असा कांगावा करत आहेत.
२. आग्य्राहून सुटका होण्याच्या प्रसंगी छत्रपती शिवराय औरंगजेबाच्याच लोकांना फितुर करून सुखरूप सुटले, ते त्यांच्या चारित्र्याच्या जोरावर !
३. दक्षिणेमध्ये ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी उभ्या केल्या होत्या, त्याही पाडून त्यांनी पुन्हा मंदिरे उभी केल्याचे इतिहासात दाखले आहेत.
४. सध्या सैनिकांना अत्यंत दुर्गम आणि कठीण परिस्थितीत लढावे लागते. त्यामुळे १५ वर्षांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याकडे सैनिकांचा कल वाढत आहे. याउलट सिंहगडावर उदयभानूशी लढतांना शेलार मामांचे वय ८० वर्षे होते आणि तरीही त्यांना शिवाजी महाराजांच्या सैन्यातून निवृत्त व्हावे, असे वाटत नव्हते. इतकी ते सैन्याची काळजी घेत होते. सैन्य असेल, तरच आपल्या सीमा सुरक्षित राहू शकतात, याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
५. आज जगात ५० हून अधिक मुसलमान देश आहेत; परंतु इराक आणि इराण या देशांचे कधी पटले नाही. १०० हून अधिक ख्रिस्ती देश आहेत; परंतु जर्मनी आणि इंग्लंड यांचे कधी पटले नाही आणि त्यांनीच जगाला पहिल्या अन् दुसर्या महायुद्धात लोटले. हिंदु धर्मात मात्र अनेक उपासनापद्धती असूनही त्यांनी कधीही युद्ध लादले नाही. मग कुणाचा धर्म शांती शिकवतो ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात